न थकेगा, ना रुकेगा; पवारांच्या निवृत्तीची चर्चा केवळ वाफाच
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातून निवृत्त होणार असून त्यानंतर त्यांचा पक्ष भाजपप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, शरद पवार हे थकणारे आणि थांबणारे नेते नाहीत, अशी ठाम भूमिका विरोधी तसेच सत्ताधारी पक्षांनी घेतल्याने पवारांच्या निवृत्तीच्या चर्चा या केवळ राजकीय वाफाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. हे विधेयक मंजूर व्हावे यासाठी भाजपकडून पडद्यामागे मतांच्या आकडेवारीची तयारी सुरू आहे. डिलिमिटेशन विद्येयकाबाबत राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून सकारात्मक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रिकरण, शरद पवार एनडीएसोबत जातील अशा राजकीय वावडया उठल्या जात आहेत. त्यातच शरद पवार राजकीय निवृत्ती स्विकारण्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
चुकीची चर्चा घडवून आणली जातेयं – फौजिया खान
शरद पवार आणि राष्ट्रवादीबाबत कुणीतरी वेस्टेड इनटरेस्ट म्हणून चुकीची चर्चा घडून आणत आहे. यात काहीही सत्य नाही. आम्ही कुठेही भाजपसोबत जाणार नाहीत, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. वारंवार कशाला या अशा चर्चा होतात?, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांनी केला.
पवारांनी शेवटपर्यंत राजकारणात राहावे – संजय शिरसाट
या वयातही शरद पवार यांच्या कामकाजाची स्फुर्ती पाहता पवार हे निवृत्ती घेतील असे वाटत नाही. त्यांनी शेवटपर्यंत राजकारणात राहावे ही आमची इच्छा आहे. एनडीए प्रवेशाबाबत राष्ट्रवादीत काय चालले हे माहीत नाही. पक्षात वेगवेगळी मते असल्यामुळे वरीष्ठ नेते काय तो निर्णय घेतील, असे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले.
शरद पवार इंडिया आघाडीसोबतच – संजय राऊत
शरद पवार यांचं संपूर्ण राजकारण धर्मांध शक्तींविरुद्ध लढण्यात आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवण्यात गेलं आहे. शरद पवार हे इंडिया आघाडीत आहेत आणि इंडिया आघाडीसोबतच राहतील. तसेच सुपिया सुळेही एनडीएसोबत जाणार नाहीत, असा ठाम विश्वास असल्याचे सांगत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पवारांच्या निवृत्तीच्या चर्चा फेटाळून लावल्या.
एनडीएमध्ये जाणं अवघड – भुजबळ
शरद पवार यांना वाटलं की, डिलिमिटेशनचा निर्णय योग्य आहे, त्याला मदत केली पाहिजे तर ते करतील. पण शरद पवार एनडीएमध्ये जाणं थोडं अवघड दिसत आहे. ते शक्य होईल असं वाटत नाही, असे स्पष्ट करत अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी पवारांच्या निवृत्तीची चर्चा फेटाळली.
कोणी निवृत्त व्हायचं, हे जनता ठरवेल – सुप्रिया सुळे
शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबाबत अशा निवृत्तीच्या बातम्या येणं अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या राज्यसभेचा अजून 5 वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे, मग ते कसे निवृत्त होतील? कोणी निवृत्त व्हायचं, हे जनता ठरवेल, असे राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ते कधीच थांबणार नाहीत – फडणवीस
शरद पवार आजही सक्रिय असून, विविध प्रकल्प आणि कामांमध्ये ते सातत्याने रस घेतात. ते आयुष्यात कधीच थांबणार नाहीत. ते यापुढेही सकारात्मक काम करत राहतील. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीबाबत चर्चा करणे योग्य नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
निवृत्तीचा कथित फॉर्म्युला
शरद पवार स्वतः भाजपसोबत गेल्यास त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय भूमिकेला छेद जाईल. यामुळे शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी आणि त्यानंतर सुप्रिया सुळे व ज्येष्ठ नेते जयंत पाटील आदींनी एनडीएसोबत जावे, अशी चर्चा राष्ट्रवादीत सुरू आहे. काही नेत्यांनी यासंदर्भात भाजप नेतृत्वाशी चर्चा केली आहे, असा निवृत्तीचा कथित फॉर्म्युला मांडला जात आहे.
Comments are closed.