स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या, आदित्य ठाकरेंच्या सूचनेने ठाकरेंचे खासदार नाराज

नवी दिल्ली: ठाकरे गटाच्या खासदारांना गळाला लावण्यासाठी शिंदे गटाकडून राबवण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’च्या (Operation Tiger) अनुषंगाने सध्या दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या सत्कार सोहळ्याला शरद पवार यांनी उपस्थिती लावल्याच्या विरोधात संजय राऊत यांनी केलेल्या टीकेमुळे बुधवारी महाराष्ट्राचा राजकीय अवकाश व्यापून गेला होता. मात्र, गुरुवारची सकाळ उजाडताच शरद पवार सोडाच पण ठाकरेंच्या स्वत:च्या पक्षाचे खासदार शिंदे गटाशी सुमधूर संबंध जपत असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली असली तरी ठाकरे गटाचे (Thackeray Camp) खासदार गुपचूप शिंदे गटाच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या भोजनावळींना (Dinner) उपस्थिती लावत असल्याची माहिती समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे गुरुवारी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी दिल्लीत ठाकरे गटाच्या खासदारांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपल्या खासदारांना सक्त सूचना दिल्या. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बोलावलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या, असे त्यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेमुळे शिवसेनेचे खासदार नाराज झाल्याचे सांगितले जात आहे. मंत्र्यांनी बोलावल्यानंतर जायला हवे, असे सांगत ठाकरे गटाच्या संबंधित खासदारांनी आपली नाराजी बोलून दाखवली. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आदित्य ठाकरे यांनी बुधवारी रात्री दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. यानंतर आज सकाळी आदित्य ठाकरे यांनी दिल्लीतील संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकार  परिषद घेतली. यावेळी अरविंद सावंत, संजय ( बंडू ) जाधव , संजय देशमुख, राजाभाऊ वाजे हे खासदार त्याठिकाणी उपस्थित होते. तर नागेश पाटील आष्टीकर हे त्यांना पु्न्हा आपल्या मतदारसंघात जायचे असल्याने विमान पकडण्यासाठी एअरपोर्टवर गेले. तर संजय दिना पाटील हे आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळेवर पोहोचू शकले नव्हते. त्यानंतर आदित्य ठाकरे हे अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी गेले. तेव्हा संजय दिना पाटील आणि राजाभाऊ वाजे हे आदित्य ठाकरे यांच्यासोबत दिसून आले.

शिंदे गटाच्या स्नेहभोजनाला ठाकरे गटाचे कोणते खासदार?

केंद्रीय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांच्या घरी नुकताच स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी यांनी स्नेहभोजनाला हजेरी लावली होती. तर खासदार नागेश आष्टीकर यांनी दिल्लीतील घरी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि श्रीरंग बारणे हे दोघेजण उपस्थित होते. याशिवाय, श्रीकांत शिंदे यांनीही महाराष्ट्रातील खासदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या स्नेहभोजनाला ठाकरे गटाचे खासदार चुकूनही जाणार नाहीत, असा अंदाज होता. परंतु, ठाकरे गटाचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील या स्नेहभोजनाला उपस्थित होते. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या खासदारांची जवळीक वाढली आहे का, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

https://www.youtube.com/watch?v=99R7F2ZZ1B8

आणखी वाचा

Operation Tiger: ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या मंत्र्याच्या घरी जेवले, एकजण एकनाथरावांच्या सत्काराला, ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याचे संकेत?

अधिक पाहा..

Comments are closed.