पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल

पुणे : शहरातील स्वारगेट बस स्थानकावर (Bus) उभ्या बसमध्ये एका 26 वर्षीय महिलेवर अत्याचाराची घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप होत आहे. एकीकडे महिला प्रवाशांना 50 टक्के सवलत दिल्याने महिलांची गर्दी वाढली आहे. मात्र, दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे. स्वारगेटमधील अत्याचाराच्या घटनेनंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर आता शासनही गंभीर झाले आहे. परिवहनमंत्र्यांनी संबंधित घटनेची दखल घेत चौकशी करण्याच आदेश दिले आहेत. तसेच, स्वारगेट (Pune) स्थानकावरील सर्वच सुरक्षा रक्षकांना काढून दुसरे सुरक्षा रक्षक नेमण्याचे निर्देशही दिले आहेत. आता, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी घटनेची दखल घेत, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल असा शब्द लाडक्या बहि‍णींना दिला आहे.

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक,  सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी ट्विटरद्वारे दिली. तसेच, याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल, हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनी, मातांना देतो, असा शब्दही अजित पवारांनी दिला आहे. दरम्यान, पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्याचेही अजित पवार यांनी म्हटले.

मंत्रालयात उद्या बैठक

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वारगेट बसस्थानकातील बलात्काराच्या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख (सहाय्यक वाहतूक अधिक्षक) व  आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय चौकशी करून दोष आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे, असे निर्देश उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी ) विवेक भीमनराव यांना दिले आहेत. तसेच एकूणच महिला प्रवाशांच्या सुरक्षे संदर्भात आढावा घेण्यासाठी उद्या एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ मंत्रालयात बैठक बोलाविण्याचे  निर्देश देखील मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

हेही वाचा

पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश

अधिक पाहा..

Comments are closed.