महायुतीत नाराजीचे खटके उडताच आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचलं; म्हणाले, चला, आज परत कोणीतरी ग
मंत्रिमंडळ बैठक शिंदे कॅम्प शिवसेना : राज्यात काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थानिक पातळीवर नवीन राजकीय समीकरणे दिसून येत असल्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या गोटात प्रचंड अंतर्गत खदखद असल्याची माहिती समोर आली आहे. याच अंतर्गत नाराजीमुळे शिंदे गटाच्या (Shivsena) मंत्र्यांनी मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर अघोषित बहिष्कार टाकल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, आज राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) नियोजित बैठक होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी प्रत्येक पक्षाची प्री-कॅबिनेट बैठक होते. शिंदे गटाच्या प्री-कॅबिनेट बैठकीत शिवसेनेचे सगळे मंत्री उपस्थित होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला यापैकी एकही मंत्री गेला नाही. केवळ एकनाथ शिंदे (मराठी) हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेच्या उर्वरित मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला. याबाबतचे वृत्त राजकीय वर्तुळात चर्चेत आल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहून शिवसेना शिंदे गटाला डिवचलं आहे.
Aaditya Thackeray: चला, आज परत कोणीतरी गावी जाणार…
आदित्य ठाकरेंनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय की, असं कळलंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. गेलेच नाहीत! का? तर म्हणे राग आलाय! भयंकर राग! मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपावर! निवडणुकीतलं जागावाटप आणि म्हणे ह्यांचा पक्ष फोडताएत म्हणून! ह्याला म्हणतात चोर मचाये शोर! पण ह्यांच्या स्वार्थापोटी राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे! मंत्रीमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत! कसा चाललाय हा कारभार?! महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे. चला, आज परत कोणीतरी गावी जाणार…असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं आहे.
Shivsena News: नाराजीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही
शिंदे गटाच्या या नाराजीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या नाराजीमागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यानिमित्ताने सुरु असलेली फोडाफोडी कारणीभूत असल्याचे समजते. आज सकाळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जातीने उपस्थित होते. भाजपने कालपासून ही बातमी गुप्त ठेवत श्रीकांत शिंदे यांच्या जवळच्या नगरसेवकांना गळाला लावले होते. याशिवाय, राज्याच्या इतर भागांमध्येही शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपकडून गळाला लावले जात आहे. यावर शिंदे गटाचे मंत्री प्रचंड नाराज आहेत. त्यामुळेच या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे समजते. सध्या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक सुरु आहे. ठाणेपालघर, कल्याण भागातील शिंदे गटाचे पदाधिकारी प्रचंड नाराज आहेत. गेल्य काही दिवसांपासून गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात जनता दरबार घेण्याचा सपाटा लावला आहे. तर रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना गळाला लावून मानाने भाजपमध्ये प्रवेश दिला होता. या सगळ्या घडामोडींवर शिंदे गट प्रचंड नाराज असल्याचे समजते.
Shivsena News: शिवसेना शिंदे गटाचे कोणते मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी अनुपस्थित?
उदय सामंत
प्रताप सरनाईक
दादा भुसे
संजय शिरसाट
प्रकाश आबिटकर
भरत गोगावले
शंभूराज देसाई
गुलाबराव पाटील
Shivsena Shinde Camp: शिवसेना मंत्र्यांची नाराजीची कारणे
1 भाजप सेनेचे नेते ,नगरसेवक व पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश आपल्या पक्षात करून घेत आहेत
2 ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या त्याच उमेदवारांना भाजप आपल्या पक्षात घेत आहे
3 शिंदेच्या अनेक नेत्यांना किंवा पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता अनेक निर्णय दिले जातात किंवा निधी वळवला जातो
4 आगामी निवडणुकीत युतीचा धर्म पाळला जात नाही
5 निधी मिळवण्यासाठी शिंदेच्या मंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे
6 संभाजी नगर ,कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, कोकण या ठिकाणी भाजपने असे प्रवेश करून घेतलेत ,किंवा युतीचा धर्म पाळला नाही
आणखी वाचा
Comments are closed.