अलिबागच्या हापूसची एपीएमसीत एन्ट्री, नऊ पेट्यांना चांगला दर मिळणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हापूस आंब्याचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच अलिबागच्या हापूसने बाजारात एन्ट्री केली आहे. चव, सुगंध आणि दर्जासाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबागच्या हापूसच्या नऊ पेट्या वाशी येथील एपीएमसी बाजारात दाखल झाल्या आहेत. हंगामाच्या सुरुवातीलाच आंबा दाखल झाल्याने या पेट्यांना चांगला दर मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

रत्नागिरी आणि देवगडच्या हापूसप्रमाणेच अलिबागचा हापूसही आपल्या खास चवीसाठी ओळखला जातो. अलिबागच्या हापूसचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा आकर्षक रंग, मधुर चव, मोहक सुगंध आणि रसाळ गर. या आंब्याची चव आणि नैसर्गिक गोडवा ग्राहकांच्या पसंतीस उतरतो. किनारपट्टीचे हवामान, जमीन आणि स्थानिक नैसर्गिक परिस्थिती यांचाही आंब्याच्या चव व दर्जावर परिणाम होतो. त्यामुळे अलिबागच्या हापूसला बाजारात स्वतंत्र ओळख मिळाली आहे. अलिबाग तालुका प्रामुख्याने भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. मात्र आता येथील आंबा उत्पादकांनाही विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. ग्रामीण भागातील आंबा देशभरासह परदेशातही पोहोचू लागला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि शास्त्रीय पद्धतीने आंब्याच्या बागांची निगा राखली जात असल्याने तरुण शेतकरीही आंबा उत्पादनाकडे वळत आहेत.

आर्थिक फायदा होणार

यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने काही भागांतील आंब्याच्या झाडांना सप्टेंबरमध्येच मोहोर आला. आंबा उत्पादकांनी योग्यवेळी फवारणी करून झाडांची विशेष काळजी घेतल्याने या मोहोरातून तयार झालेली फळे आता बाजारात पाठविण्यासाठी तयार झाली आहेत. त्यातूनच डॉ. संदेश पाटील यांच्या बागेतील हापूसच्या नऊ पेट्या वाशी बाजारात रवाना करण्यात आल्या. हंगामाच्या सुरुवातीलाच अलिबागचा हापूस बाजारात दाखल झाल्याने आगामी काळात उत्पादन वाढण्याची आणि शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments are closed.