सांगलीत 74 टँकर्सद्वारे 66 गावांना पाणीपुरवठा
सांगली जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सांगलीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारण्यासाठी टँकर व विहीर अधिग्रहणाद्वारे प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. बाधित गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, तसेच स्थानिक पातळीवर खासगी विहिरी व बोअरचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेच्या 17 नोव्हेंबरपर्यंतच्या अहवालानुसार 66 खासगी व आठ शासकीय अशा एकूण 74 टँकर्सद्वारे 66 गावे व 479 वाडय़ांतील एक लाख 43 हजार 888 बाधित लोकसंख्येला व 97 हजार 434 पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी 30 खासगी विहिरी-बोअर अधिग्रहित केल्या आहेत.
जत तालुक्यातील टंचाईग्रस्त 57 गावे व 414 वाडय़ांमधील सुमारे एक लाख 24 हजार 867 लोकसंख्येला आणि 81 हजार 222 पशुधनाला 64 टँकरद्वारे (57 खासगी व 7 शासकीय) पाणी पुरवले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात 18 खासगी विहिरी-बोअर अधिग्रहित करण्यात आल्या असून, चार डिझेल इंजिन भाडय़ाने घेण्यात आले आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यातील टंचाईग्रस्त एक गाव व आठ वाडय़ांमधील 1834 लोकसंख्येसाठी एक शासकीय टँकर सुरू आहे. नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीतील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्यामुळे गावात पाणीटंचाई भासू नये, यासाठी दोन खासगी विहिरी-बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तासगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त एक गाव व सहा वाडय़ांमधील 855 लोकसंख्येला एका खासगी टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. तालुक्यात तीन खासगी विहिरी-बोअर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
आटपाडी तालुक्यातील टंचाईग्रस्त सात गावे व 51 वाडय़ांमधील 16 हजार 332 नागरिकांना आणि 16 हजार 212 पशुधनाला आठ खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या तालुक्यात चार विहिरी-बोअर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. खानापूर तालुक्यात दोन गावे टंचाईग्रस्त असून, तीन खासगी विहिरी-बोअर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
Comments are closed.