अशोक खरातविरोधात ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र; रिमोटचा साप, 2 लाखांची चिंचेची बी ते 142 बे

अशोक खरात: धर्माच्या नावाखाली आणि चमत्काराचा खोटा आव आणून निष्पाप भक्तांना कोट्यवधी रुपयांना लुटणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) तब्बल 3000 पानांचे अवाढव्य आरोपपत्र (Chargesheet) दाखल केले आहे. या आरोपपत्रात भोंदू खरातच्या आजवरच्या काळ्या कारनाम्यांचा संपूर्ण लेखाजोखा मांडण्यात आला असून, तब्बल 30 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

Ashok Kharat: स्वतःला देवाचा अवतार सांगून भक्तांची लूट

ईडीने आरोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा स्वतःला भगवान शिवाचा अवतार असल्याचा दावा करायचा. भक्तांवर स्वतःचा प्रभाव निर्माण करण्यासाठी तो धार्मिक कार्यक्रमांमध्ये हायटेक तंत्रज्ञानाचा गैरवापर करायचा. लोकांवर जादूई प्रभाव पाडण्यासाठी तो रिमोट कंट्रोलने चालणारे कृत्रिम साप वापरायचा, तसेच वाघाच्या कातड्याचा वापर करून आपल्याकडे अलौकिक शक्ती असल्याचा आभास निर्माण करायचा. इतकेच नव्हे तर, महिला भक्तांना गुंगीचे औषध दिल्याचाही खुलासा आरोपपत्रात करण्यात आला आहे.

Ashok Kharat: 2 लाखांना चिंचेची बी, 9 लाखांना मध

भोंदू खरातने भक्तांना लुटण्यासाठी फसवणुकीचा कळस गाठला होता. तो आपल्या अलौकिक शक्तींचे दावे करून साध्या चिंचेच्या बियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांना विकायचा. तसेच खडे आणि मधाच्या बाटल्यांना प्रत्येकी 9 लाख रुपयांना विकून त्याने लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली.

Ashok Kharat: श्रीमंत व्यावसायिकांना दाखवायचा मृत्यूची भीती

खरातचे मुख्य टार्गेट श्रीमंत व्यावसायिक असायचे. “तुमच्यावर दैवी प्रकोप होणार आहे, घरातल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणार आहे, तुमचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडणार आहे,” अशी भीती तो श्रीमंतांच्या मनात घालायचा. या भितीपोटी घाबरलेले व्यावसायिक त्याच्या जाळ्यात ओढले जायचे आणि त्यानंतर हा भोंदू बाबा ‘अवतार पूजा’ आणि मोठ्या देणग्यांच्या नावाखाली त्यांना कोट्यवधी रुपयांना लुबाडायचा.

अशोक खरात : १४२ बेनामी बँक खाती

लोकांना लुटून कमावलेली ही काळी कमाई पांढरी करण्यासाठी खरातने मोठा कट रचला होता. त्याने तब्बल 142 बेनामी खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली. सहकारी पतसंस्था, बेनामी बँक खाती, त्याचे कुटुंबीय आणि निकटच्या साथीदारांच्या माध्यमातून त्याने या पैशांचे कथित मनी लॉन्ड्रिंग केले. हा सगळा पैसा त्याने महाराष्ट्रातील विविध भागांत रिअल इस्टेट आणि आलिशान मालमत्तांमध्ये गुंतवल्याचा गंभीर आरोप ईडीने केला आहे. ईडीच्या या 3000 पानांच्या आरोपपत्रामुळे आता या भोंदू बाबाचे संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुकला जंतरमंतरवरून का काढले? शेवटी मोठे कारण समोर आले

Comments are closed.