गुरू प्रकाश, मानव आघाडीवर
आशियाई ज्युनियर ओपन आणि गर्ल्स क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पटावर अक्षरशः उलटफेराचे वादळ घोंगावले. २११३ मानांकनाच्या गुरू प्रकाशने २३३९ मानांकनाच्या, नुकत्याच आशियाई ज्युनियर रॅपिड विजेत्या विवान विशाल शाहला धक्का देत सनसनाटी विजय मिळवला. मानव कुमारनेही उच्च मानांकित अरुण कटारियाला नमवत खळबळ उडवली. तसेच हार्दिक शाहने तुर्कमेनिस्तानच्या अमानमुहम्मेत होमाडोव्हला बरोबरीत रोखले. अव्वल मानांकित मयंक चक्रवर्तीने सलग दुसरा विजय मिळवत दोन गुणांची आघाडी कायम ठेवली.
मुलींच्या गटात सुनेत्रा डेने प्रिशिता गुप्ताला रोखले, तर त्रिपुरांबिका व्ही आणि प्रणवश्री एस यांनीही मोठे धक्के दिले. अव्वल मानांकित प्रतीती बोरदोलोईने सलग दुसरा विजय मिळवला.
बुद्धिबळासाठी अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या ग्रँडमास्टर विदित गुजराथीचा आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत मुंबई शहर बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम भिलारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले. याप्रसंगी ठाणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सलील घाटे आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोलेही उपस्थित होते.
Comments are closed.