श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! तिलक वर्माकडे कर्णधारपद, वैभव सूर्यवंशीचाही संघात समावेश
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी (१४ मे) श्रीलंकेत होणाऱ्या आगामी वनडे तिरंगी मालिकेसाठी १५ सदस्यीय भारत अ संघाची घोषणा केली आहे. जूनमध्ये होणाऱ्या या मालिकेसाठी २३ वर्षीय फलंदाज तिलक वर्माची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. संघात वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्य यांच्यासह रियान पराग याची उपकर्णधार म्हणून समावेश करण्यात आला आहे.
संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, ज्यांनी देशांतर्गत स्पर्धा आणि आयपीएल २०२६ मध्ये चांगली कामगिरी केली आहे. विकेटकीपर म्हणून प्रभसिमरन सिंग आणि कुमार कुशाग्र यांची निवड केली आहे.
निवडलेल्या खेळाडूंपैकी वैभवचे नाव विशेष आहे. लागोपाठ आयपीएल हंगामांमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या वैभवला भारतीय संघात निवडले जावे अशा चर्चा सुरू होत्या. तो आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत असून त्याने आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांत ४४० धावा केल्या आहेत. त्यामध्ये एक शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे.
भारताच्या १९ वर्षाखालील संघाचा भाग असणाऱ्या वैभवने आशिया कप, वनडे विश्वचषक या स्पर्धांमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने २०२६ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यांत इंग्लंड विरुद्ध ८०चेंडूंतच १७५ धावा केल्या होत्या. त्याच्या या स्फोटक खेळीने संघ सहाव्यांदा विजेता ठरला होता.
या तिरंगी मालिकेत यजमान श्रीलंका अ, भारत अ आणि अफगाणिस्तान अ हे संघ सहभागी होतील. मर्यादित षटकांच्या तिरंगी मालिकेनंतर, भारत अ संघ, श्रीलंका अ संघाविरुद्ध दोन बहुदिवसीय सामनेही खेळणार आहे. या वनडे सामन्यांसाठीचा संघ नंतर जाहीर केला जाणार आहे. तसेच ही मालिका दंबुला येथे, तर बहुदिवसीय सामने गॉल येथे खेळवले जाणार आहेत.
तिरंगी मालिकेसाठी भारत अ संघ – टिळक वर्मा (कर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, रायन पराग (उपकर्णधार), आयुष बडोनी, निशांत सिंधू, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, प्रभासिमरन सिंग (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्रा (यष्टीरक्षक), विप्रराज निगम, यशवीर सिंह ठाकूर, युवराज ठाकूर आणि अरविंद खान.
तिरंगी मालिकेचे वेळापत्रक-
९ जून, २०२६ – भारत अ विरुद्ध श्रीलंका अ
११ जून, २०२६ – भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ
१३ जून, २०२६ – अफगाणिस्तान अ विरुद्ध श्रीलंका अ
१५ जून, २०२६ – भारत अ विरुद्ध श्रीलंका अ
१७ जून, २०२६ – भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ
१९ जून, २०२६ – अफगाणिस्तान अ विरुद्ध श्रीलंका अ
२१ जून, २०२६ – तिरंगी मालिकेचा अंतिम सामना
Comments are closed.