बीडमध्ये प्रेम प्रकरणाचा थरारक शेवट, मुलीच्या घरच्यांकडून बेदम मारहाण; छळामुळे तरुणाने चिठ्ठी ल

बीड गुन्हे: बीड तालुक्यातील मांजरसुंबा परिसरात प्रेमसंबंधांच्या वादातून एका 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे (वय 23) असे मृत तरुणाचे नाव असून, प्रेयसीच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीमुळे आणि मानसिक छळामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मांजरसुंबा येथील ज्ञानेश्वर याचे नेकनूरजवळील एका गावातील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी संतापाच्या भरात ज्ञानेश्वरला गावात बोलावून घेतले. त्यानंतर त्याची दुचाकी आणि मोबाईल काढून घेत चार जणांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप करत गावात बदनाम केल्याचेही समोर आले आहे.

Beed Crime:  “मला खूप मारले, गावात चोरटा म्हणून बदनाम केले”

या मारहाणीमुळे आणि सार्वजनिक बदनामीमुळे ज्ञानेश्वर गंभीर मानसिक तणावाखाली गेला होता. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने, “मला खूप मारले, गावात चोरटा म्हणून बदनाम केले, तुला जिवे मारून टाकू अशा धमक्या दिल्या,” असा उल्लेख केला आहे. घटनेनंतर ज्ञानेश्वरने धुळे–सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका टायर पंक्चर दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Beed Crime:  “माझ्या मुलाला झाडाला बांधून मारहाण केली”

दरम्यान, मृताच्या आईने गंभीर आरोप करत म्हटले आहे की, “माझ्या मुलाला बोलावून झाडाला बांधून मारहाण करण्यात आली आणि त्याचे व्हिडिओही काढण्यात आले. आरोपींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत उंदरे, सचिन उंदरे, अशोक उंदरे आणि प्रेम उंदरे अशी आरोपींची नावे असून, त्यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat: अशोक खरातच्या भविष्यवाणीनुसार ‘तो’ आमदार तितक्याच मार्जिनने निवडून आला अन् दोन कार्यकर्त्यांच्या मृत्यूचं भाकीतही खरं ठरलं, नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात खळबळजनक दावा

Ashok Kharat Nashik Crime News: कोर्टात आणताच न्यायमूर्तींनी विचारलं, काही तक्रार आहे का? भोंदूबाबा अशोक खरातचं एका शब्दात उत्तर; म्हणाला…

आणखी वाचा

Comments are closed.