‘आका’च्या बराकीत होऊ शकतो पाठकांचा पुढचा मुक्काम! बँक खाती, लॉकर आणि बेनामी मालमत्ता तपास अधिकाऱ्यांच्या रडारवर

संपूर्ण प्रशासन आपल्या बोटावर नाचवणाऱ्या वाल्मीक कराडची मैत्री तेव्हा कामाला आली आणि अविनाश पाठक थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसले. खुर्चीच्या नशेत धुंद झालेले पाठक मस्तवाल झाले आणि एका प्रकरणात अडकले. यात अडकलेल्या पाठकांचे पाय गाळात आणखीच रुतत गेले. सात दिवसांच्या पोलीस कोठडीत त्यांची सर्व बँक खाती, लॉकर आणि बेनामी मालमत्ता तपास यंत्रणेच्या रडारवर असणार आहे. जर तपास यंत्रणेला यात मोठे घबाड सापडले, तर मात्र पाठकांसाठी जामिनाचे दरवाजे बंद होतील आणि बीडच्या कारागृहात ‘आका’च्या बराकीतच त्यांचा पुढचा मुक्काम असू शकतो.

‘घर फिरले की घराचे वासे फिरतात’ आणि माणसाला शून्य व्हायला एक काळरात्र पुरेशी असते, याचा प्रत्यय नुकताच बीडमध्ये आला. भूसंपादन आणि मोबदला (मावेजा) घोटाळ्यात अडकलेले तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते. चौकशीत त्यांची बँक खाती आणि लॉकर तपासले जाणार आहेत; तसेच त्यांचे नातेवाईक आणि संबंधित व्यक्तींच्या मालमत्तेचीही चौकशी केली जाणार आहे. उत्पन्नापेक्षा जास्त बेनामी मालमत्ता समोर आली, तर अविनाश पाठक यांना लवकर जामीन मिळणे कठीण होईल, असा अंदाज कायदेतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

अविनाश पाठक यांना या प्रकरणात अटक केल्यानंतर, त्यांनी सामान्य लोकांना कसे फसवले, कायद्याच्या कात्रीत कसे पकडले आणि त्यांचे कसे शोषण केले, याचे अनेक अनुभव सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 15 वर्षे पुढाऱ्यांची हुजरेगिरी करत सामान्यांचे शोषण करणाऱ्या अविनाश पाठक यांच्याबद्दल सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. त्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासले जात असून त्यातून धक्कादायक बाबी समोर येत आहेत.

कितीही चातुर्याने बोगसगिरी केली, तरी कारभाराचा पर्दाफाश होण्यासाठी एक घटना पुरेशी असते. बँक आणि लॉकरमध्ये अतिरिक्त संपत्ती तसेच बेनामी मालमत्ता सापडली, तर पाठकांचा कारागृहातील मुक्काम दीड-दोन वर्षांचा असू शकतो, असाही अंदाज वर्तवला जात आहे. ज्या वाल्मीक कराडने अविनाश पाठक यांना जिल्हाधिकारी म्हणून बीडमध्ये आणले, त्याच्याच शेजारच्या बराकीत पाठक काही महिने व्यतीत करतील, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

‘सुंदरी’ दिसताच पोपटासारखे बोलू लागले

घोटाळा प्रकरणी सात दिवसांच्या पोलीस कोठडीत असलेले तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक सध्या तपास अधिकाऱ्यांच्या गराड्यात आहेत. मोबदला (मावेजा) प्रकरणाच्या व्याप्तीचा शोध घेतला जात आहे. आज तपासासाठी त्यांना दोन-तीन ठिकाणी नेले जाणार आहे. सुरुवातीला तपास अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती देण्यास नकार देणारे अविनाश पाठक, आता अधिकाऱ्यांच्या हातातील छडी बघताच पोपटासारखे बोलू लागले आहेत.

Comments are closed.