चंपत राय, अनिल मिश्रा यांना देणगी चोरी प्रकरणात क्लीन चिट
एसआयटीने राज्य सरकारला सोपविला अहवाल
वृत्तसंस्था/ लखनौ
अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरातील दानचोरीच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने मंगळवारी स्वत:चा अंतिम अहवाल राज्य सरकारला सोपविला आहे. गृह विभागाने अहवालाचे परीक्षण केल्यावर आवश्यक कारवाईसाठी तो श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला उपलब्ध करविला आहे. सूत्रांनुसार अंतिम अहवालात राम मंदिर ट्रस्टचे माजी महासचिव चंपत राय यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. तर ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांच्यावरही कुठलेच आरोप ठेवण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.
ट्रस्टच्या विनंतीनुसार राज्य सरकारने 13 जून रोजी लखनौ विभागाचे आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय एसआयटी स्थापन केली होती. पोलीस महासंचालक किरण एस. आणि विशेष सचिव नील रतन कुमार यांना एसआयटीचे सदस्य करण्यात आले होते. एसआयटीने तपासादरम्यान दानाशी निगडित प्रकरणांमध्ये समोर आलेली तथ्यं, दस्तऐवज आणि संबंधित लोकांच्या जबाबाची पडताळणी केली.
8 आरोपींच्या विरोधात गुन्हे नोंद
एसआयटीने 23 जून रोजी स्वत:चा प्रारंभिक अहवाल सरकारला सोपविला होता. प्रारंभिक अहवालात याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. याच अहवालाच्या आधारावर 25 जून रोजी राम जन्मभूमी पोलीस स्थानकात गुन्हे नेंद करण्यात आले होते. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या तक्रारीवर नोंद गुन्ह्यांमध्ये अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष कुमार यादव, करुणेय पांडे, रमाशंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव आणि राम शंकर यादव उर्फ टिन्नू यांना आरोपी करण्यात आले होते. यानंतर अन्य अज्ञात लोकांनाही आरोपी करण्यात आले. प्रारंभिक अहवालाच्या आधारावरच आरोपींना अटक करण्यात आली होती.
भूमिकेवर सवाल
दानचोरी प्रकरण समोर आल्यावर चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या भूमिकेवरून प्रश्न उपस्थित झाले होते. वादादरम्यान दोघांनीही ट्रस्टमधील स्वत:च्या पदांचा राजीनामा दिला होता. आता राज्य सरकारकडून स्थापन एसआयटीच्या अहवालात क्लीनचिट देण्यात आल्याने दोघांनाही दिलासा मिळाला आहे.
Comments are closed.