पाच राज्यांच्या निवडणूक निकालांनंतर काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल; ‘लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडी अधिक आक्रमक होणार’
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेसने भाजपवर तीव्र टीका करत केंद्रीय तपास यंत्रणा, निवडणूक आयोग आणि सरकारी यंत्रणांचा राजकीय हेतूंसाठी गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. विरोधकांना लक्ष्य करून आणि लोकशाही संस्थांवर दबाव टाकून भाजप निवडणुका लढवत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला.
सत्ताधारी भाजपने राजकीय नैतिकता बाजूला ठेवत ईडी, सीबीआय आणि अन्य केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी केला, अशी टीका करतानाच तिवारी यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत झालेले आरोप आणि विरोधकांनी व्यक्त केलेला अविश्वास हा लोकशाहीसाठी चिंतेचा विषय असल्याचे काँग्रेसने म्हटले.
तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल निवडणुकांदरम्यान केंद्रीय तपास यंत्रणा आणि निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत काँग्रेसने न्यायालयांनी वेळोवेळी तपास यंत्रणांवर ताशेरे ओढल्याची आठवण करून दिली. काही प्रकरणांमध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करून निवडणूक आयोगाला आधार कार्डासारख्या कागदपत्रांच्या मान्यतेसाठी सूचना द्याव्या लागल्या, हे आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न निर्माण करणारे असल्याचेही तिवारी यांनी नमूद केले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा ५२ वरून १०२ वर गेल्या असून भाजपच्या जागा ३०३वरून २४० वर घसरल्या, याचा उल्लेख करत तिवारी यांनी देशातील जनतेने संसदेत मजबूत विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारल्याचा दावा केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत आक्रमक भूमिका घेतली असून लोकशाही, संविधान आणि संस्थांच्या स्वायत्ततेसाठी सातत्याने आवाज उठवत असल्याचे त्यांनी नमूद केले.
काँग्रेसने पुढे म्हटले की, भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याचा प्रयत्न करत असला तरी इंडिया आघाडी अधिक संघटित आणि आक्रमक होईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येऊन संघर्ष अधिक तीव्र करतील, असा निर्धारही काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरही काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला. “नारी शक्ती वंदन” विधेयकाचा वापर हा प्रत्यक्ष महिला सक्षमीकरणासाठी नसून मतदारसंघ पुनर्रचना पुढे रेटण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप पक्षाने केला. महिलांमध्ये सहानुभूती निर्माण करण्यासाठी आणि विरोधकांवर खोटे आरोप करण्यासाठी भाजपने या मुद्द्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
दरम्यान, केरळमधील काँग्रेस आघाडीच्या यशाला पक्षाने महत्त्वपूर्ण जनादेश मानले आहे. राष्ट्रीय पातळीवर विरोधात असतानाही केरळमधील जनतेने काँग्रेसच्या विचारसरणीवर विश्वास दाखवल्याचा दावा पक्षाने केला.
Comments are closed.