एकनाथ शिंदेंसमोर काळोखे कुटुंबीय धाय मोकलून रडलं; शिंदे म्हणाले, या केसवर माझं लक्ष, ठेचून काढू
रायगड : खोपोलीच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी काळोखे कुटुंबीयांनी केली. त्यावर आपण काळोखे कुटुंबीयांच्या मागे ठामपणे उभे असून कुणालाही सोडणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.
नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर काहीच दिवसात मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि त्यांच्या गुंडांनी ही हत्या केल्याचा आरोप शिवसेनेने केला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काळोखे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
एकनाथ शिंदेंना भेटताच काळोखे कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. आरोपींवर मोका लावा, त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी काळोखे कुटुंबीयांनी यावेळी केली.
मराठी On Khopoli Murder : आरोपींना ठेचून काढू
एकनाथ शिंदे म्हणाले की, “मी काळोखे परिवाराच्या मागे उभा आहे. लोकांनी ज्यांना विजयी केलं त्यांच्याविरोधात सूडाचं राजकारण करण्यात आलं. अशी घटना परत घडता कामा नये. माझं या केसवर लक्ष आहे. मी बघतो काय करायचं ते. कुणालाही सोडणार नाही, आरोपींना ठेचून काढू.“
या प्रकरणात ज्या पोलीस अधिकाऱ्याने दुर्लक्ष केलं त्या सचिन हिरेंना ताबडतोब निलंबित करा अशी मागणी यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली.
मंगेश काळोखे खून प्रकरण: दहा जणांवर गुन्हा
रायगड जिल्ह्यातीतल खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची 26 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, रवींद्र देवकर, दर्शन देवकर यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल केला. तर, मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि त्याचा मुलगा दर्शन देवकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.
खोपोली हत्याकांड : शिवसेनेचा तटकरेंवर आरोप
दरम्यान, या हत्या प्रकरणानंतर रायगड जिल्ह्यात जोरदार राजकारण पेटल्याचं दिसतंय. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवर आरोपांची तोफ डागली. सुनील तटकरे रायगडचे आका आहेत, तटकरेंच्या सांगण्यावरून रायगडमध्ये रक्तरंजित राजकारण सुरू आहे, विरोधकांच्या हत्या केल्या जात असल्याचा आरोप थोरवेंनी केली. तर मंगेश काळोखे यांची हत्या पूर्वनियोजित असल्याचा दावाही थोरवेंनी केला. मात्र, घडलेली घटना निर्दयी असून राजकारण करणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया तटकरेंनी दिली. घटनेचा तपास करून पोलिसांनी कारवाई करावी, अशी प्रतिक्रियाही तटकरेंनी दिली.
दोन आरोपी ताब्यात
मंगेश काळोखे यांच्या हत्येतील मुख्य दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन रवींद्र देवकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी 8 वेगवेगळ्या तपास टीम कार्यरत होत्या. खोपोली, नवी मुंबई, मुंबई एअरपोर्ट, रायगडमध्ये अन्य परिसरात 8 टीम काल पासून कार्यरत होत्या. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे शनिवारी सकाळी रवींद्र देवकर, दर्शन देवकर यांच्या गाडीला पोलिसांनी गाडी आडवी टाकून पकडल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.