‘क्या रे जॉनी’ म्हणत डोक्यावर टपली मारताच संतापला, नागपूरमध्ये क्षुल्लक वादातून तरुणाला संपवलं;
नागपूर क्राईम न्यूज: नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील उमरेड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्यंत किरकोळ आणि क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला भररस्त्यात संपवण्यात आले. उमरेडमधील कावरापेठ परिसरात ही घटना घडली असून, या संपूर्ण घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, यामुळे नागपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
राजकुमार पवार असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या वादाची सुरुवात अत्यंत किरकोळ कारणावरून झाली होती. सुरुवातीला राजकुमार पवार यांचा मुख्य आरोपी सोहेल ऊर्फ जॉनी शेख याच्या एका मित्रासोबत शाब्दिक वाद झाला होता. आपल्या मित्रासोबत वाद सुरू असल्याची माहिती मिळताच आरोपी सोहेल शेख हा दुचाकीने तातडीने घटनास्थळी पोहोचला.
Nagpur Crime News: डोक्यावर मारलेली टपली बेतली जीवावर
घटनास्थळी वाद सुरू असतानाच, समोरून राजकुमार पवार यांनी “क्या रे जॉनी…” असे म्हणत सोहेलच्या डोक्यावर टपली मारली. सार्वजनिक ठिकाणी मारलेल्या या टपलीमुळे सोहेलचा राग अनावर झाला. त्याने काहीही विचार न करता थेट आपल्या कमरेला लपवून आणलेला चाकू काढला आणि राजकुमार यांच्यावर हल्ला चढवला.
Nagpur Crime News: जखमी अवस्थेतही दुचाकीवर उभा राहण्याचा प्रयत्न
राजकुमार यांच्यावर वार केल्यानंतर आरोपी सोहेल आपल्या दुचाकीवरून वेगाने पसार झाला. चाकू लागल्यानंतरही गंभीर जखमी झालेले राजकुमार काही वेळ दुचाकीला धरून तिथेच उभे राहिले. त्यानंतर अन्य एका व्यक्तीला सोबत घेऊन ते स्वतः रुग्णालयाच्या दिशेने गेले. मात्र, चाकू पोटात खोलवर रुतल्याने शरीराच्या आतील अवयवांना गंभीर दुखापत झाली होती आणि प्रचंड रक्तस्त्राव सुरू होता. राजकुमार यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.
Nagpur Crime News: मुख्य आरोपी अटकेत
या थरारक घटनेनंतर उमरेड पोलिसांनी मुख्य आरोपी सोहेल ऊर्फ जॉनी शेख याला तात्काळ अटक (Arrested) केली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासानुसार, केवळ सोहेलच नाही तर त्याचे इतरही काही मित्र या कटात किंवा वादात सामील असण्याची दाट शक्यता पोलिसांना आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उमरेड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.