कुठलं बोलणार… काय आहे? एकनाथ शिंदे भडकले, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करूही तोडगा निघेना?

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांशी अनेकदा चर्चा होऊनही, एकनाथ शिंदे यांनी दिल्ली वारी करूनही विधान परिषदेच्या निवडणुकीवर तोडगा निघत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळेच की काय एकनाथ शिंदे हे पत्रकारांच्या प्रश्नावर भडकल्याचं दिसून आलं. विधान परिषदेच्या जागांवर पत्रकारांनी प्रश्न विचारताच, एकनाथ शिंदे चांगलेच संतापले. कुठलं बोलणार… काय आहे? असं म्हणत ते संतापल्याचं दिसून आलं.

विधान परिषदेच्या जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे पत्रकारांसमोर आले खरे, परंतु त्यांना पहिलाच प्रश्न विधान परिषदेच्या बैठकीबाबत केल्याने ते पत्रकारांवर प्रचंड संतापले. त्यांनी पत्रकारांनाच उलट सवाल केला. त्यांची बदललेली देहबोली पाहता, चर्चांना उधाण आलं. त्यामुळं या बैठकीत नेमकं काय घडलं, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शिवसेना पाच ते सहा जागांवर आग्रही

शिंदेंची शिवसेना विधान परिषदेच्या पाच ते सहा जागांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रायगड, हिंगोली परभणी या जागांवर शिवसेना आग्रही आहे. त्याचवेळी भाजप छत्रपती संभाजीनगरवर आग्रही आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस रायगडच्या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे अनेकदा बैठका होऊनही महायुतीच्या जागांचा तिढा संपताना दिसत नाही.

रायगड रत्नागिरीच्या जागेवर शिवसेनेची ताकद आहे. तरीदेखील त्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळत नाही. एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी दिल्लीचा दौरा केला, मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली. तरीदेखील शिवसेनेला अपेक्षित जागा मिळताना दिसत नाही. त्यामुळे भाजपकडून शिवसेनेची कोंडी होत आहे का असं चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर किंवा रायगड रत्नागिरीयापैकी किमान एक जागा तरी आपल्याला मिळावी यासाठी शिवसेना आग्रही असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत 20 मिनिटे चर्चा

राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली. विधान परिषदेच्या जागांवर त्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच ते सहा जागांची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. नाशिक, ठाणे आणि जळगावच्या जागांसाठी शिवसेनेने आग्रही भूमिका घेतली होती. आतापर्यंत झालेल्या बैठकीत शिवसेनेला ठाणेनाशिक, यवतमाळ आणि परभणीची जागा सुटल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी (Vidhan Parishad Election 2026) होणार आहे.

Vidhan Parishad Election 2026:  निवडणूक कार्यक्रम जाहीर

अधिसूचना जारी: 25 मे

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून

अर्जाची छाननी : 2 जून

अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून

मतदान : 18 जून – स. 8 ते दु. 4.

मतमोजणी : 22 जून

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.