एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर कॅबिनेट मंत्र्यांची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारात खांदेपालट होणार
मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून केंद्रातही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. अधिवेशनापूर्वीच राज्यात ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे ठाकरेंना धक्का दिलाय. ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला रवाना होत आहेत. तत्पूर्वी त्यांनी राज्यातील शिवसेनेच्या (Shivsena) सर्वच कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली असून सर्व मंत्र्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आगामी मंत्रिमंडळ विस्तारावरुन अॅक्शन मोडवर आहेत. नंदनवन बंगल्यावर शिवसेनेतील वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्र्यांसोबत त्यांची बैठक होत आहे. बैठकीत केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार आणि राज्यातील रखडलेल्या महामंडळ विस्तारावर चर्चा होणार असून राज्यातही कॅबिनेटमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या कामावरही नाराजी असल्याने त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे समजते.
एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर
एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. एकदिवसीय दिल्ली दौरा करून एकनाथ शिंदे आज रात्री मुंबईत पुन्हा परतणार आहे. आज दुपारी एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल होतील. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच दिल्लीत येत आहेत. राज्यातील इतरही काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्व आलं आहे.
उद्धव ठाकरेंवर निशाणा
बैठकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनास पाठिंबा दिल्यावरुन एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला. खरं म्हणजे आता इतक्या उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावे लागेल, त्यांचा सगळ्यावेळेस बाहेरुन पाठिंबा असतो. तुम्ही लढा आम्ही बाहेरुन कपडे सांभाळतो, बुडाला आग लागलीय आणि डोंगराची आग विझवायला जात आहेत, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. सोनम वानचूक यांचे काय आता? जेव्हा जेव्हा सरकारविरोधात आंदोलनं असतात तेव्हा यांचा त्यांना पाठिंबा असतो. श्रीलंका, बांगलादेश, नेपाळमध्ये झालं त्याची आठवण करुन देण्याचं काम ते करत आहेत. पोळी कशी भाजून घेता येईल यासाठी राजकारण करण्याचा प्रयत्न आहे, असे म्हणत सोनम वांगचूक यांच्या आंदोलनास पाठिंबा दिल्यावरुन एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
पंतप्रधानांच्या नेतृ्त्वात देश पुढे जातोय
कायदा सुव्यवस्था कशी बिघडेल, अराजकता कशी माजेल यासाठी हे प्रयत्न करत आहेत. बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका इथली आर्थिक परिस्थिती रसतळाला गेली होती, पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखालील आपल्या देश पुढे जात आहे. 80 हजार लोकांना अन्न धान्य देण्याचे काम होतंय, 32 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेतून वर आणण्याचा प्रयत्न होतोय, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
हेही वाचा
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Comments are closed.