पुण्यात दरोडा टाकण्याची तयारी, आंतरराज्यीय टोळीला बेड्या; अहिल्यानगरमधून चोरली बोलेरो

पुणे : जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस (Police) यंत्रणा अलर्ट मोडवर असून पुणे जिल्ह्यातील ओतूर (Pune) हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी 6 आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल, जिवंत काडतूस आणि इतर हत्यारांसह 14 लाख 87 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राथमिक तपासात आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असून गंभीर स्वरूपाचे एकूण 20 गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचं उघडकीस आलं आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याच्या लोणी प्रवरा येथून चोरीस गेलेली बोलेरो जीप ही ओतूर पोलीस ठाणे हद्दीत दिसून आली. या जीपच्या मालकाचे नातेवाईक विघ्नेश सुभाष घोलप हे या वाहनाचा शोध घेत असताना ओतूरमध्ये त्यांना हे वाहन आढळून आले. त्यावेळी, वाहनासह असलेल्या संशयित इसमांकडे त्यांनी विचारणा केली असता, त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यामुळे, विघ्नेश घोलप यांनी “चोर-चोर” अशी आरडाओरड केल्याने गावकरी घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर गावकरी व आरोपी यांच्यात झटापट होऊन दोन आरोपींना गावकऱ्यांनी पकडले. तर इतर चार आरोपी गर्दीचा फायदा घेऊन पळून गेले, घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ताबडतोब स्थानिक गुन्हे शाखा व ओतूर पोलीस स्टेशनमधील पोलीस पथकांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींचा पाठलाग केला गेला. शोधकार्यात सातत्य ठेवून आलमे गावच्या डोंगर दरी परिसरातून पळून गेलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

आरोपी सराईत, 20 गुन्हे उघडकीस

आरोपी हे सराईत गुन्हेगार असून ते हत्यारासह असल्याने काळजीपूर्वक तपास करुन आरोपींना ताब्यात घेणे आवश्यक होते. त्यासाठी आलमे, बल्लाळवाडी, कोळवाडी परिसरातील नागरिक तसेच पोलीस पाटील यांच्या मदतीने पळून गेलेल्या चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी, आरोपींकडे सखोल चौकशी केली असता महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी व वाहन चोरी असे एकूण 20 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामध्ये 2 दरोडे, 1 दरोड्याचा प्रयत्न, 2 जबरी चोरी, 13 घरफोडी आणि 2 वाहन चोरीचे गुन्हे समाविष्ट आहेत. दरम्यान, आरोपींवर यापूर्वी महाराष्ट्रासह तेलंगणा व इतर राज्यांमध्ये 50 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे आहेत. दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा आरोर्पीना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

हेही वाचा

बापाने आईला संपवलं, तीन निरागस चिमुरड्यांना काहीच समजलं नाही, पोलीस स्टेशनमध्ये येताच ब्लँकेटवर अंग टाकून झोपी गेली

Comments are closed.