आधी म्हणाले युतीधर्म पाळा, आता म्हणाले अर्ज मागे घेऊ नका; शिंदेंचा आदेश अन् ‘कोकण’वरुन ट्विस्ट

मुंबई : कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीत आता मोठा ट्विस्ट आल्याचं दिसून येतंय. ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत त्यांनी ते अर्ज 4 जून पर्यंत मागे घेऊ नयेत अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांना दिल्या आहेत. एकीकडे युतीधर्म पाळण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या असताना अर्ज मागे घेण्याबाबत दिलेल्या नव्या सूचनेवरून मोठा संभ्रम निर्माण झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा सुरू राहण्याच्या शक्यता आहे.

कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना कमालीची आग्रही होती. परंतु, महायुतीमध्ये झालेल्या जागावाटपामध्ये कोकण विधान परिषदेची जागा ही राष्ट्रवादीला गेली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे हे अर्ज भरणार आहेत. परंतु, अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत कुणीही अर्ज मागे घेऊ नका असा स्पष्ट आदेश एकनाथ शिंदेंनी शिवसेना नेत्यांना दिला आहे. ट

शिवसेनाचा दावा, जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विधान परिषदेच्या मतदारसंघात शिवसेनेचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी शिवसेनेचे नेते आग्रही होते. राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी त्यांच्या सुपुत्र, विकास गोगावले यांच्यासाठी प्रयत्न सुरू केला होता. त्याचवेळी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.

दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ती जागा राष्ट्रवादीलाच जाणार अशी चर्चा सुरू झाली. नंतर झालेल्या जागावाटपात कोकणची जागा राष्ट्रवादीलाच गेली. त्यामुळे या ठिकाणी अनिकेत तटकरे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.

त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी कोकणातील शिवसेना आमदार आणि पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली. शिंदेंनी त्यावेळी आमदारांशी चर्चा करून त्यांना युतीधर्म पाळण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आता त्यांच्या आणखी एका वक्तव्यानंतर संभ्रम निर्माण झाला आहे.

एकीकडे युतीधर्म पाळा म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेनेच्या उमेदवारांनी भरलेले अर्ज 4 जून पर्यंत मागे घेऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. विधान परिषदेच्या जागेबाबत अंतिम चर्चा झाल्यानंतरच उमेदवारीवर निर्णय घेऊ असं शिंदेंनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत चर्चा सुरूच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पालकमंत्रिपदाची चर्चा

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांना दिलेल्या सूचनेमागे रायगडच्या पालकमंत्रिपदाचं गणित दडल्याची चर्चा सुरू आहे. सुनील तटकरेंच्या मुलाला उमेदवादी देण्याच्या बदल्यात राष्ट्रवादीने पालकमंत्रिपद हे शिवसेनेला द्यावं, अशी मागणी सेनेकडून केली जात असल्याची सूत्रांनी माहिती दिली. त्यासंबंधी बोलणी जरी झाली असली तरी अंतिम शिक्कामोर्तब अजून व्हायचा आहे. त्यामुळेच शिंदेंनी आमदारांना 4 जून पर्यंत अर्ज मागे घेऊ नका अशा सूचना दिल्याची माहिती आहे.

Vidhan Parishad Election 2026:  निवडणूक कार्यक्रम जाहीर

अधिसूचना जारी: 25 मे

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून

अर्जाची छाननी : 2 जून

अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून

मतदान : 18 जून – स. 8 ते दु. 4.

मतमोजणी : 22 जून

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.