पाणीटंचाईनंतर पालिकेची विहिरींकडे धाव! मुंबईकरांचे टेन्शन वाढले, जलसाठा 76 टक्क्यांवर; विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी 7.8 कोटींचा निधी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईवरील पाण्याचे टेन्शन कायम आहे. मुंबई आणि उपनगराला पाणीपुरवठा करणाऱया सात धरणांतील जलसाठा सोमवारी 76.80 टक्क्यांपर्यंत खाली आला. गेल्या वर्षी हा पाणीसाठा 89.90 टक्के इतका होता. म्हणजेच तुलनेने सुमारे 13 टक्क्यांची घट झाली आहे. वाढत्या उन्हामुळे धरणांतील पाण्याचे मोठय़ा प्रमाणात बाष्पीभवन होत असून पाण्याची पातळी खाली घसरत चालली आहे. मुंबईकरांवर 10 टक्के पाणीकपात लागू असताना आगामी काळात पाण्याचे नियोजन अधिक काटेकोरपणे करण्याची गरज निर्माण झाली आहे. यादृष्टीने पालिका प्रशासनाने  पाणी गळती रोखणे आणि विहिरींच्या पुनरुज्जीवन करण्याकडे लक्ष दिले आहे. मुंबईतील विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी 7.8 कोटींची निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांना दररोज सुमारे 4100 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांची सध्याची पाण्याची मागणी 4600 एमएलडी एवढी आहे. या फरकामुळेच मुंबईकरांवर पाणीसंकट निर्माण झाले आहे. मुंबई महापालिका हद्दीत सध्या 10 टक्के पाणीकपात लागू आहे. मात्र ही पाणीकपात आणखी वाढवण्याचा महापालिका प्रशासनाचा सध्या तरी विचार नाही. उलट राज्य शासनाकडून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करून देण्याची तयारी पालिकेने केली आहे. तसे मागणी पत्र राज्य सरकारला देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेय.

प्रत्येक वॉर्डात पाच विहिरींच्या कामासाठी 30 लाख रुपये

मुंबईतील विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामासाठी मुंबईतील सर्व वॉर्ड स्तरावर एकूण 7.8 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पालिका हद्दीतील पारंपरिक विहिरींची स्वच्छता करणे, त्यांचा गाळ काढणे व साठवण क्षमता वाढवणे आणि पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात 30 लाखांचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निधीतून प्रत्येक वॉर्डातून पाच विहिरींवर काम केले जाणार आहे

मुंबईत दररोज  होणाऱ्या पाणीपुरवठय़ातील 34 टक्क्यांचा हिशेब लागत नसल्याची बाब समोर आली आहे. पाणीगळती, पाणीचोरी-अनधिकृत जोडण्या, मीटर एरर या माध्यमातून पाणी गायब होत आहे. त्याचा शोध घेण्यासाठी वॉटर डिस्ट्रीब्युशन  इम्प्रूव्हमेंट प्रोग्रॅम (डब्ल्यूडीआयपी) अंतर्गत एजन्सी नियुक्त करण्यात आल्या आहेत, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईत अंदाजे 4500हून अधिक विहिरी-बावडय़ा आहेत. यातील बहुतांश विहिरी पुन्हा वापरात आणल्यास पाण्याचे अतिरिक्त स्त्राेत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या माध्यमातून काही अंशी पाणीटंचाईवर मात करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

Comments are closed.