बेकायदा बाईक टॅक्सीला रिक्षाचालकांचा विरोध; प्रवासी सुरक्षेबाबत उपस्थित केला प्रश्न, झा समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई महानगर क्षेत्रात बेकायदेशीररीत्या चालवल्या जाणाऱ्या बाईक टॅक्सींना रिक्षाचालकांनी तीव्र विरोध केला आहे. अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्यासारख्या घटनांमुळे बाईक टॅक्सी सेवांमधील प्रवासी सुरक्षा, चालकांची पडताळणी आणि संबंधित अॅप कंपन्यांची जबाबदारी याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. याच अनुषंगाने रमानाथ झा समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी रिक्षाचालकांकडून जोर धरत आहे.

राज्य सरकारने 12 जानेवारी 2023 रोजी बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासंदर्भात विविध बाबींचा अभ्यास करण्यासाठी माजी सनदी अधिकारी रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. समितीच्या बैठकीत मुंबई रिक्षामेन्स युनियनने बाईक टॅक्सी सेवेमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य समस्या, पारंपरिक रिक्षा व टॅक्सी व्यवसायावर होणारे परिणाम, प्रवाशांची सुरक्षितता तसेच वाहतूक व्यवस्थेवरील संभाव्य परिणाम याबाबत मुद्दे उपस्थित केले होते. त्याची दखल घेत समितीने सरकारकडे आपला अहवाल सादर केला होता. मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूरसारख्या प्रमुख महानगरांमध्ये काळ्या-पिवळ्या रिक्षा, टॅक्सी, शासकीय बससेवा, लोकल रेल्वे तसेच मेट्रोसेवा यांसारखी सार्वजनिक वाहतुकीची साधने मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे अशा महानगरांमध्ये बाईक टॅक्सी सेवांची आवश्यकता नाही, असे समितीने अहवालात म्हटले आहे. झा समितीच्या या अहवालाला अनुसरून बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात पावले उचलण्याची मागणी रिक्षाचालकांकडून केली जात आहे.

इतर राज्यांतील नोंदणीकृत वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक

महाराष्ट्रात इतर राज्यांमधील नोंदणीकृत वाहने बाईक टॅक्सी सेवांच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करीत आहेत. अशा वाहनांना महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी, आवश्यक परवाने, विमा, वाहन नोंदणी व इतर वैधानिक अटींची पूर्तता आहे किंवा नाही, याची तपासणी होणे आवश्यक आहे, असे म्हणणे मुंबई महानगर क्षेत्र टॅक्सी/रिक्षा संघटना महासंघाने मांडले आहे. यासंदर्भात महासंघामार्फत परिवहन आयुक्तांना निवेदन दिले जाणार आहे.

Comments are closed.