LPG Gas Shortage: हॉटेल-दुकानं बंद, कुठे लाकडी भट्टी सुरु; वाचा A टू Z माहिती

एलपीजी गॅसची कमतरता: इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद आता भारतातही उमटू लागले असून त्याचा थेट परिणाम एलपीजी (LPG) पुरवठ्यावर होताना दिसत आहे. केंद्र सरकारने (Central Government) खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्रीसमोर मोठे संकट निर्माण झाले असून पुढील काही दिवसांत हा उद्योग ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच अनेक शहरांमध्ये गॅस सिलेंडर घेण्यासाठी मोठ-मोठ्या रांगा लावल्या आहेत. अनेक शहरांमध्ये हॉटेल-दुकानं बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

अहिल्यानगरमध्ये एमआयडीतील जवळपास 15 ते 20 कंपन्यांवर परिणाम

आखती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस तुटवडा निर्माण झाला आहे. याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावर झाला असून अहिल्यानगर एमआयडीतील जवळपास 15 ते 20 कंपन्यांवर परिणाम झाला आहे. केवळ एक दिवस पुरेल एवढाच गॅससाठा असल्याने एका कंपनीतील जवळपास 500 कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देण्याची वेळ कंपन्यावर येणार आहे म्हणजे एकट्या अहिल्यानगर एमआयडीसीतील 9 ते 10 हजार कामगारांवर परीणाम होणार आहे.

पोळी भाजी केंद्रांकडे १ ते २ दिवसाचा गॅस शिल्लक

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात सर्व सामान्य घरातील कुटुंबांची पोळी भाजी केंद्रे आहेत. ही सर्व केंद्रे बाजूबाजूला आहेत, ज्यांचा व्यवसाय गॅस सिलेंडरवर अवलंबून आहे. मात्र त्यांच्याकडे शेवटच्या १ ते २ दिवसाचा गॅस शिल्लक आहे. तसेच यानंतर सिलेंडर मिळणार नाही असे एजन्सीकडून सांगण्यात आले आहे, जे सिलेंडर उपलब्ध आहे ते प्रचंड जास्त महाग आहेत, अधिकृत किमतीपेक्षा जास्त दराने विकले जात आहेत, त्यामुळे सिलेंडर मिळाला तरी तोटा सहन करून केंद्र सुरू ठेवावे लागणार आहे, त्यामुळे या युद्धातून सरकारने काही ना काही मार्ग काढावा असे या पोळी भाजी केंद्र चालकांचे मत आहे.

साखरगाठी यावेळी परदेशात जाणार नाही

आखाती देशांतील युद्धाची झळ आता साताऱ्यातील मिठाई व्यवसायिकांना बसू लागली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्याने मिठाई आणि साखरगाठी तयार करणाऱ्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे.साताऱ्याची प्रसिद्ध साखरगाठ परदेशातही पाठवली जाते, मात्र यंदा गॅस टंचाईमुळे परदेशी ऑर्डर्स पाठवणार नसल्याचे देखील व्यावसायिक राऊत मिठाईवाले यांनी सांगितले. दरम्यान, गॅस उपलब्ध नसल्याने कारागिरांचे काम ठप्प झाले असून दुकाने बंद करण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्याय म्हणून लाकडी भट्टी सुरू करण्याचा विचारही सुरू आहे. एकूणच गॅस टंचाईमुळे साताऱ्यातील मिठाई व्यवसायिकांवर मोठे संकट ओढावले आहे.

सोलापुरात घरगुती गॅस ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करताना तांत्रिक अडचणी

सोलापुरात घरगुती गॅस ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करताना तांत्रिक अडचणी येत आहेत.ऑनलाईन गॅस बुकिंग होतं नसल्याने ग्राहक सिलेंडर घेऊन थेट एजन्सीला येत आहेत. मात्र दिवसाचा कोटा सकाळीच संपल्याने गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून देखील ग्राहकांना गॅस मिळतं नाहीये. एकीकडे शासन गॅसचा मुबलक साठा असून घाबरण्याचे गरज नाही असं सांगत आहे, मग आम्हाला गॅस मिळतं का नाही असा सवाल ग्राहक उपस्थित करत आहेत. तर दुसरीकडे ग्राहकांनी एजन्सीला येऊ नये, गॅस घरपोच दिले जाईल असे आश्वासन एजन्सीतर्फे दिलं जातं आहे.

धाराशिवमध्ये व्यावसायिक गॅस पुरवठा बंद

अमेरिका इराण युद्धाचा परिणाम धाराशिवमध्ये व्यावसायिक गॅस पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. जिल्हाभरात भारत व एचपी गॅस कंपनीच्या प्रमुख गॅस वितरण केंद्रावरून गॅस पुरवठा बंद केला आहे. व्यावसायिक गॅस पुरवठा बंद असल्याने हॉटेल व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे. धाराशिव शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातील कॅन्टीन बंद होण्याच्या परिस्थितीत आहे. तीन ते चार दिवस पुरेल एवढाच गॅस शिल्लक, गॅस पुरवठा न झाल्यास हजारो प्रवाशांना फटका बसणार आहे. राज्यभरातून हजारो प्रवासी ये जा करतात त्यांच्या सेवेसाठी असणारे कॅन्टीन गॅस पुरवठा न झाल्यास बंद होणारआहे.

पुण्यातील हॉटेल्समध्ये मेन्यू कार्ड बदलण्याची वेळ

गॅस तुटवड्यामुळे पुण्यातील हॉटेल्समध्ये मेन्यू कार्ड बदलण्याची वेळ आली आहे. जे पदार्थ एकाचवेळी शिजवून तयार करता येतात असे पदार्थच ग्राहकांना देता येणं शक्य आहे, मात्र ऐनवेळी तयार करावे लागणारे पदार्थ देणं बंद केल्याचं हॉटेल्स व्यावसायिकांनी म्हटलंय. त्यामुळे ग्राहकांना इडली किंवा वडा मिळू शकतो पण डोसा मिळणार नाही.  हे पदार्थ देखील पुढचे दोन दिवसच मिळू शकतील, गॅस पुरवठा पुर्ववत न झाल्यास पुण्यातील हॉटेल्स दोन ते तीन दिवसांत बंद पडतील असा इशारा पुणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिला आहे.

सोलापूर जिल्ह्यात तुतवाडा निर्माण होणार नाही

सोलापूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा गॅस,पेट्रोल,डिझेलचा तुतवाडा निर्माण होणार नाही यासाठी जिल्हा पुरवठा प्रशासन सज्ज असल्याचं सांगितलं जात आहे. युद्धजन्य परिस्थितीत प्रशासनाकडून घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी ‘फिरते पथक’ स्थापन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण 94 गॅस एजेंसी असून त्या सर्व एजन्सीला जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून सूचना  देण्यात आल्या आहेत. आपल्या जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवस्थित पुरवठा सुरू आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा पुरवठा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. लातूरधाराशिव, छत्रपती संभाज नगर, जालना या जिल्ह्यांना ही सोलापूर मधून इंधन पुरवठा केला जातो आहे. स्थानिक तहसीलदार, नायब तहसीलदार, अशा एकूण 4 जणांचं फिरते पथक असणार आहे. गॅस,पेट्रोल, सीएनजी (cng)चा पुरवठा खंडित होणार नाही यासाठी यंत्रणा सज्ज आहे.

कोल्हापुरातील हॉटेल व्यवसाय मेटाकुटीला

आखाती देशांमधील युद्धामुळे व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील हॉटेल व्यवसाय मेटाकुटीला आला आहे. कोरोना पेक्षा बिकट अवस्था होईल अशी भीती हॉटेल व्यवसायिकांना आहे. गॅस पुरवठा एजन्सी कडून आम्हाला कोणतीही माहिती दिली जात नाही किंवा आम्हाला गॅस पुरवठा देखील केला जात नाही. त्यामुळे पुढच्या दोन दिवसात हॉटेल व्यवसायिकांवर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये LPG, PNG,MNGL चा मोठा तुडवडा

अमेरिका इस्राईल इराण युद्धाचा उद्योगांवर मोठा परिणाम दिसून येत आहे. नाशिकमध्ये LPG, PNG,MNGL चा मोठा तुडवडा निर्माण झाला आहे. अंबड – सातपूर येथील १०० पेक्षा जास्त कंपन्यांकडे आज एक दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक आहे. आज दिवसभरात व्यावसायिकांवर कंपन्या बंद ठेवण्याची वेळ आली आहे, एक दिवस पुरेल इतकाच गॅस उपलब्ध असल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत.
गॅस पुरवठादारांकडून अनिश्चित काळापर्यंत पुरवठा होऊ शकणार नाही असे अधिकृत मेल उद्योजकांना पाठवले आहेत. गॅसच्या तुटवड्यामुळे नाशिकच्या सातपूर आणि अंबडमधील छोट्या मोठ्या  तब्बल २००- २५० कंपन्यांवर परिणाम होणार आहे. LPG गॅसमध्ये गेल्या दोन दिवसात प्रति किलो 36 रुपयांनी वाढ झाल्याने व्यवसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.