वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल

सांगली : राज्यात आजपासून 12 वीची परीक्षा (परीक्षा) सुरू झाली असून पहिलाच पेपर इंग्रजीचा आहे. त्यातच, राज्य सरकारकडून परीक्षेत कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे, कुठे परीक्षाचा उत्साह आहे, तर कुठे दडपणही पाहायला मिळत आहे. दरम्यान, सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिरज तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 12 वीच्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या एक दिवस अगोदरच आपलं जीवन संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अधिक तपास सुरू केला आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज येथील भारतनगरमध्ये 12 वीतील विद्यार्थाने परीक्षेपूर्वी आदल्या रात्री टोकाचे पाऊलं उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षेच्या तणावातूनच प्रथमेश बाळासाहेब बिराजदार या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भारतनगर गवळी प्लॉट येथील प्रथमेश बिराजदार हा खासगी अकॅडमीत बारावी शिकत होता. काल, सोमवारी सायंकाळी परीक्षेत पेपर कसा सोडवायचा याचे अकॅडमीतून लेक्चर ऐकून तो रात्री आठ वाजता घरी परत आला. घरी आल्यानंतर बहिणीसोबत चेष्टा मस्करी करून तो अभ्यासासाठी वरच्या खोलीत गेला. मात्र, याच खोलीत त्याने अँगलला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. कुटुंबातील सदस्य, सोमवारी रात्री 9 वाजता प्रथमेशला जेवायला बोलवण्यास गेल्यानंतर त्याने खोलीत गळफास लावून टोकाचे पाऊल उचलल्याचे निदर्शनास आल्याने कुटुंबीयांना धक्का बसला. प्रथमेशचे वडील मिरजेत कृषी विभागात सहाय्यक आहेत. प्रथमेश हा अभ्यासातही चांगला होता. मात्र, त्याने आत्महत्या का केली, याबाबत गूढ निर्माण झाले आहे. प्रथमेशने टोकाचे पाऊल उचलल्याने गावात हळहळ व्यक्त होत असून याबाबत गांधी चौक पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.

राज्यात 42 कॉपीची प्रकरणे उघडकीस

दरम्यान, राज्यातील बारावी बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 कॉपीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. यावेळी बोर्डाकडून कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवण्यासाठीचे प्रयत्न केले जात असताना पहिल्या दिवशी 42 ठिकाणी गैरप्रकार समोर आल्याची घटना घडली. त्यामध्ये सर्वाधिक छत्रपती संभाजी नगरमध्ये 26 गैरप्रकार समोर आले आहेत, तर मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागात एकही गैरप्रकार समोर आलेला नाही. काही परीक्षा केंद्रावरली कॉपीचे फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत. मात्र, प्रशासन व पोलिसांनी देखील कॉपीमुक्त अभियानासाठी विशेष प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा

मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान

अधिक पाहा..

Comments are closed.