तिलक वर्माचे शानदार नाबाद शतक अन् अश्वनी कुमारची भन्नाट बॉलिंग, एमआयकडून जीटी 99 धावांनी पराभूत

आयपीएल २०२६ चा मध्ये पाच वेळेचा विजेता मुंबई इंडियन्स विजयी मार्गावर परतला आहे. सोमवारी (२० एप्रिल) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात नेमके काय घडते याची सर्वांना उत्सुकता होती. यामध्ये एमआयने ९९ धावांनी विजय मिळवला. त्यांचा हा विजय खास कारण त्यांनी सलग चार सामने गमावल्यानंतर हा विजय मिळवला. यामध्ये एमआयने सर्वच विभागांमध्ये उत्तम कामगिरी केली.

या सामन्यात मुंबईने नाणेफेक गमावली आणि त्यांना जीटीने प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. हा सामना एमआय रोहित शर्माशिवाय खेळत होता, त्यामुळे दानिश मालेवार याला पदार्पणाची संधी मिळाली. त्याला या संधीचा फायदा घेता आला नाही. तो ४ चेंडूत २ धावा करत परतला. त्याच्यापाठोपाठ क्विंटन डी कॉकही बाद झाला. त्याने १३ (११) धावा केल्या. नमन धीरने काहीशी फटकेबाजी करत संघाचा धावफलक हलता ठेवला, मात्र ५.५ षटकानंतर एमआयची स्थिती ३ विकेट्स ४४ धावा अशी झाली.

पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला तिलक वर्मा संघासाठी तारणहार ठरला. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने ४५ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकार मारत नाबाद १०१ धावा केल्या. त्याच्या या जबरदस्त खेळीमुळे एमआयने २० षटकात ५ विकेट्स गमावत १९९ धावसंख्या उभारली.

प्रत्युत्तरात जीटी १५.५ षटकात सर्व विकेट्स गमावत केवळ १०० धावा करू शकला. त्यांच्याकडून सर्वाधिक धावा वॉशिंग्टन सुंदरने केल्या. त्याने १७ चेंडूत ५ चौकारांच्या सहाय्याने २६ धावा केल्या. या सामन्यात एमआयने फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही धमाल केली. या सामन्यातच जसप्रीत बुमराहने या हंगामातील त्याची पहिली विकेट घेतली. त्याने ३ षटकात १५ धावा देत साई सुदर्शनला पहिल्याच चेंडूवर बाद केले.

बुमराहला बाकी गोलंदाजांनीही उत्तम साथ दिली. अश्वनी कुमारने तर ४ षटकात २४ धावा देत ४ विकेट्स घेण्याची विक्रमी कामगिरी केली. तसेच अल्लाह गझनफर आणि मिचेल सॅंटनर यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.

तिलक सामनावीर ठरला. हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलाच सामनावीर पुरस्कार ठरला. तसेच एमआयचा हा जीटीविरुद्ध अहमदाबादमधील पहिला विजय ठरला आहे. येथे त्यांनी २०१४ नंतर प्रथमच विजय मिळवला आहे.

आयपीएल २०२६ मध्ये दोन विजयानंतर एमआय गुणतालिकेत सातव्या स्थानी आला असून जीटी ६ सामन्यांमध्ये ३ विजय आणि ३ पराभवामुळे सहाव्या स्थानी आहे.

Comments are closed.