अखेरच्या चेंडूवर वाचली अब्रू; जगज्जेत्या हिंदुस्थानचा रडतखडत विजय, जपानच्या पाठलागाने रोखला श्वास
अखेरच्या चेंडूवर जपानला विजयासाठी चार धावांची गरज होती. एक चौकार टीम इंडियाचे गर्वहरण करण्यासाठी पुरेसा होता. सर्वांचेच श्वास रोखले गेले होते. कारण विश्वविजेच्या टीम इंडियाची अब्रू या एका चेंडूवर अवलंबून होती. चिवट जपानच्या संघाने या सामन्यात दमदार कामगिरी केली होती आणि हा विजय त्यांच्यासाठी ऐतिहासिक ठरला असता. अनुभवी अक्षर पटेलने अचूक मारा करत संघाला विजय मिळवून दिला.
अखेरच्या चेंडूवर अक्षरचा सामना शिराई पाटमोरे करत होता. फलंदाज या चेंडूवर मोठा फटका मारणार हे अक्षरला चांगलेच माहिती होती. त्यामुळे त्याने फलंदाजाच्या पायावर लक्ष्य केले. त्यामुळे हा चेंडू फलंदाजाच्या पायाला लागला आणि फाईन लेगच्या दिशेने गेला. फलंदाज फक्त एक धाव घेऊ शकला आणि टीम इंडियाने विजयासह लाज वाचवली. पावसामुळे पाच षटकांच्या झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱया टीम इंडियाला फक्त 32 धावा करता आल्या होत्या. गोलंदाजांनी अचूक मारा करत जपानला 30 धावांवर रोखले आणि एकमेव टी-20 सामना दोन धावांनी जिंकला.
श्रेयस अय्यरने टॉस जिंपून प्रथम फलंदाजी स्वीकारली खरी, पण पहिल्याच षटकात त्यांना अभिषेक शर्माच्या रूपात पहिला धक्का बसला. अभिषेकला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. पण संजू सॅमसनने 9 धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. ईशान किशनही 3 धावांवर बाद झाला. पण कर्णधार अय्यरने 12 चेंडूंत एका चौकाराच्या जोरावर 16 धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
पाच षटकांत 33 धावांचे लक्ष्य मोठे नव्हते. पण अक्षर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सुंदर मारा करत जपानला शेवटपर्यंत जखडून ठेवले. हिंदुस्थानने रनआऊटच्या रूपात पहिल्याच षटकात जपानला धक्का दिला होता. सुंदरने यावेळी दोन विकेट्स मिळवत त्यांची 2 बाद 25 अशी अवस्था केली होती. त्यानंतरची जबाबदारी अक्षरने चोख बजावली. अक्षरने या सामन्यात दोन षटकांत फक्त सातच धावा दिल्या आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
श्रेयसच्या सामनावीर पुरस्कारावरून वाद
जपानमध्ये खेळल्या गेलेल्या नाटय़मय पाच षटकांच्या टी-20 सामन्यात जपानला 2 धावांनी पराभूत करून हिंदुस्थानच्या संघाने आपली प्रतिष्ठा वाचवली असेल. पण सामन्यानंतर देण्यात आलेल्या ‘सामनावीर’ पुरस्काराच्या निर्णयावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीत 33 व्या क्रमांकावर असलेल्या जपानसारख्या कमकुवत संघाविरुद्ध हिंदुस्थानी फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. ते पाच षटकांत केवळ 32 धावाच करू शकले. पण असे असूनही 12 चेंडूंमध्ये केवळ 16 धावा करणाऱ्या कर्णधार श्रेयस अय्यरला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या निर्णयामुळे गोलंदाजीने हिंदुस्थानची प्रतिष्ठा वाचवणाऱ्या फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरला अयोग्यरीत्या लक्ष्य केले गेले का, असा वाद निर्माण झाला आहे.
Comments are closed.