58 वर्षांचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान! टीम इंडियाची पहिली कसोटी सुरू; गवताळ खेळपट्टीवर फलंदाजांची अग्निपरीक्षा
वेलिंग्टन या मैदानात हिंदुस्थानची कामगिरी चांगली झालेली आहे. संघाने आपला पहिला कसोटी सामना येथे 1968 मध्ये खेळला होता, ज्यात त्यांनी आठ विकेट्स राखून विजय मिळवला होता. पण तेव्हापासून खेळल्या गेलेल्या सात कसोटी सामन्यांमध्ये हिंदुस्थानला एकही सामना जिंकता आलेला नाही. न्यूझीलंडने पाच विजय मिळवले तर दोन सामने अनिर्णित राखले आहेत. हिंदुस्थानच्या 2020 मधील शेवटच्या दौऱयात येथे कसोटी सामना खेळवला होता, ज्यामध्ये न्यूझीलंडने 10 विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्यामुळे गेल्या 58 वर्षांतील विजयाचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे.
बुमराच्या पुनरागमनाने वेगवान मारा भक्कम
जसप्रीत बुमराने अखेरची कसोटी 22 नोव्हेंबर 2025 रोजी गुवाहाटी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली होती. त्यानंतर आता तो पुन्हा कसोटी मैदानात उतरणार आहे. दरम्यान, संघ व्यवस्थापनाने फिरकीपटू कुलदीप यादवला कसोटी संघातून मुक्त करून त्याच्या जागी वेगवान गोलंदाज गुरनूर बरारला संघात स्थान दिले आहे. त्यामुळे हिंदुस्थानकडे वेगवान गोलंदाजीचे पर्याय वाढले आहेत. मात्र चार वेगवान गोलंदाजांसोबत रवींद्र जडेजा किंवा वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार, याचे उत्तर अद्यापि गुलदस्त्यात आहे.
पंतच्या खेळण्यावर प्रश्नच नाही!
ऋषभ पंतच्या तंदुरुस्ती आणि अलीकडच्या फॉर्मबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांना गिलने पूर्णविराम दिला. पंत हा संघातील अनुभवी खेळाडू असून त्याने जगभरात धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियातही त्याने कसोटी शतक झळकावले आहे. त्याच्या क्षमतेवर संघ व्यवस्थापनाला कोणतीही शंका नसल्याचे गिलने स्पष्ट केले. पंतने आतापर्यंत 50 कसोटी सामने खेळले आहेत.
आता प्रत्येक गुण महत्त्वाचा
टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत सध्या 51.52 टक्के गुण आहेत. अंतिम फेरी गाठण्यासाठी उर्वरित सातही कसोटी सामने जिंकण्याचे मोठे आव्हान संघासमोर आहे. हिंदुस्थानला न्यूझीलंडविरुद्ध दोन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. या सातही सामन्यांत विजय मिळवल्यास हिंदुस्थानी संघाची गुणांची कमाल टक्केवारी 70.37 पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे प्रत्येक सामना आणि प्रत्येक गुण महत्त्वाचा ठरणार आहे.
वेलिंग्टनची खेळपट्टी कशी असेल?
बेसिन रिझर्व्हची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. खेळपट्टीवर अनेकदा हिरवेगार गवत असते, ज्यामुळे पहिल्या दोन दिवसांत चेंडूला चांगली सीम मूव्हमेंट मिळू शकते, पण या मैदानाचे एक वैशिष्टय़ म्हणजे सुरुवातीच्या सत्रानंतर कधी कधी येथे फलंदाजी करणे सोपे होते. यामुळे पहिल्या डावात फलंदाजांना धावा करणे कठीण होऊ शकते, तर दुसऱया डावात फलंदाजी करणे तुलनेने सोपे असण्याची शक्यता आहे. या मैदानावर वाऱयाची भूमिका महत्त्वाची असते. वेलिंग्टन हे जगातील सर्वाधिक वारा वाहणाऱ्या शहरांपैकी एक आहे. येथील उत्तर-दक्षिण वाऱयांचा परिणाम गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक या सर्वांवर होऊ शकतो.
Comments are closed.