युद्धाचा परिणाम थेट उद्योगांवर, पाच दिवसांपासून बीडमध्ये ठिबक सिंचनच्या पाईपचे उत्पादन बंद
पलंग: आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाचे परिणाम आता थेट उद्योगावर देखील पाहायला मिळत आहे. बीडमध्ये ठिबक सिंचनचे पाईप बनवणाऱ्या कंपनीचे उत्पादन मागील पाच दिवसापासून बंद पडले आहे. क्रूड ऑइलच्या रिफायनरी बंद पडल्याने ठिबक सिंचन पाईप बनवण्यासाठी कच्चा माल मिळत नसल्यानं व्यवसायांना फटका बसत आहे. पुरवठ्याची साखळी देखील विस्कळीत झाली आहे. वाहनांसाठी डिझेल मिळेत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
रिफायनरी मध्येच क्रूड ऑइल येत नसल्याने तेथील उत्पादन बंद
ठिबक सिंचन पाईप बनवण्यासाठी जो कच्चामाल लागायचा तो कच्चामाल क्रूड ऑइलच्या रिफायनरी मधून मिळतो. परंतु आता रिफायनरी मध्येच क्रूड ऑइल येत नसल्याने तेथील उत्पादन बंद आहे. त्याचा परिणाम या उद्योगावर देखील झाला आहे. यापूर्वी कधीही न उद्भवलेली ही परिस्थिती असून कच्चामाल जवळपास दुप्पट किमतीत खरेदी करण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. परंतु त्यानंतर ठिबक सिंचनचे पाईप देखील महागणार असल्याने ते शेतकऱ्यांना परवडणारे नसेल अशा स्थितीत आता युद्ध थांबल्यासच हे उत्पादन पूर्व पदावरील येईल अशी माहिती उद्योजक संतोष उपरे यांनी दिली आहे.
इराण इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्धाचा तणाव
इराण इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. या आखाती देशांमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचे गंभीर सावट आता महाराष्ट्रातील बाजारपेठांवर दिसू लागले आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार विस्कळीत झाला आहे. याचा थेट परिणाम मुंबईतील ऐतिहासिक क्रॉफर्ड मार्केट आणि नाशिकमधील द्राक्ष निर्यातीवर बसला आहे. मुंबईचे मुख्य व्यापारी केंद्र असलेल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये आयात होणाऱ्या सुकामेव्याची आवक कमालीची घटली आहे. युद्धामुळे अरबी समुद्रातील मालवाहतूक आणि विमान सेवा विस्कळीत झाल्याने प्रामुख्याने इराण आणि आसपासच्या देशांतून येणारा माल रोखला गेला आहे. इराणी पिस्ता, खजूर, बेदाणे आणि पाईन नट्स यांसारख्या पदार्थांचा पुरवठा खालावला आहे.
नाशिकची द्राक्ष निर्यात ५० टक्क्यांनी घटली
नाशिक जिल्ह्यालाही या युद्धाचा मोठा फटका बसला आहे. नाशिकचे जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी नाशिकमधून १ लाख ३१ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. मात्र, आखाती देशांतील अस्थिरतेमुळे यंदा हे प्रमाण निम्म्यावर म्हणजेच ६५ ते ७० हजार मेट्रिक टनांवर आले आहे. युरोप आणि आखाती देशांकडे जाणारी द्राक्षे बंदरांवर अडकून पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. द्राक्षांशिवाय कांदा, डाळिंब आणि इतर पालेभाज्यांची निर्यातही मंदावली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.