करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन सोनवणेंचा सवाल

बीड : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit pawar) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी उद्या म्हणजेच 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बारामतीत महायुतीची जाहीर सभा संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेत्यांनी येथील सभेला संबोधित केलं. फडणवीसांनी सुनेत्रा पवार यांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करण्याचं आवाहन बारामतीकरांना (Baramati) केलं असून विरोधात उभारलेल्या उमेदवारांनी केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी निवडणुकीत अर्ज भरल्याचंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, आमदार धनंजय मुंडे हेही सभेला उपस्थित होते. कारण, धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) पत्नी करुणा शर्मा यांनीही येथील निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावरुन, आता खासदार बजरंग सोनवणेंनी मुंडेंना डिवचलं.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर भाष्य करताना बजरंग सोनवणेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंना टोला लगावला. बाहेरचे हवशे, गवशे, नवशे तिथे गेले असून आमच्या बीडच्या ताई देखील तिथे जाऊन निवडणुकीत उभारल्या आहेत. त्यांनी म्हटले की, माझ्या पतीराजाला विचारुन मी फॉर्म भरला, हा प्रकार नेमका काय? ही भानगड काय? हेच कळत नसल्याचा सवाल बजरंग सोनवणेंनी उपस्थित केला. प्रत्येक पक्षाने सुनेत्रा पवार यांना बिनशर्त पाठिंबा दिला पण निवडणूक ही कुणाची खोडी हे सुद्धा कळायला पाहिजे, असे म्हणत बजरंग सोनवणे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना डिवचलं. दरम्यान, करुणा शर्मा, अभिजीत बिचुकले यांच्यासह बारामतीमधील काही उमेदवारांनीही पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, येथे 23 एप्रिल रोजी मतदाना पार पडणार आहे.

तपास लागल्याचा तो दिवस कधी येणार

दरम्यान, बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या विमान अपघातबाबतही प्रश्न उपस्थित केला. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली, ब्लॅक बॉक्स कुठे? तपास कोणत्या दिशेने ऑफिशिअली आणि अनऑफिशिअली देखील माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं. पण, महाराष्ट्राची इच्छा आहे, या गोष्टीचा तपास लागला पाहिजे आणि सत्य महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येक सभेत या घटनेचा तपास सुरू आहे, असं सांगितलं जातंय. त्याबाबत मुख्यमंत्र्यांचे कौतुक, ते एखादी गोष्ट करायची असं म्हणतात पण कधी करणार तो दिवस कधी येणार याबाबत माहीत नाही, असे म्हणत सोनवणेंनी टोला देखील लगावला.

हेही वाचा

बाई नाही, तर लेकराची आई कडाडली; वाहतूक कोंडीने एवढं का संतापली महिला, मंत्र्यांनाही सुनावलं, नेमकं कारण काय?

आणखी वाचा

Comments are closed.