सहा दिवस रुग्णालयात दाखल करण्याची अट; 103 ताप असलेल्या 15 महिन्यांच्या बाळाला हाकलले
बीड जिल्ह्यातील केज येथे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या नावाखाली रुग्णांची अडवणूक होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. 103 ताप असलेल्या 15 महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी किमान सहा दिवस उपचार घ्यावे लागतील, अशी अट घालण्यात आल्याचा आरोप आहे. या अटीबाबत शासनाचा आदेश (GR) दाखवण्याची मागणी केल्याने बाळाच्या वडिलांना डॉक्टरांकडून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याचा दावा आहे. त्यानंतर तापाने फणफणणाऱ्या बाळाला कुटुंबासह रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले. बाळाच्या वडिलांनी फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
केज तालुक्यातील शिरपूर येथील साईनाथ घुले यांच्या 15 महिन्यांच्या बाळाला सोमवारी प्रचंड ताप आला. बाळाची प्रकृती गंभीर वाटल्याने त्याला तातडीने मिळेल त्या वाहनाने केज येथे आणण्यात आले. कानडी रोडवरील योगिता नर्सिंग होममध्ये बाळाला उपचारासाठी नेण्यात आले. तेथे डॉ. दिनकर राऊत यांनी बाळाची तपासणी केली. त्यानंतर बाळाला रुग्णालयात दाखल करावे लागेल, असे सांगण्यात आले.
साईनाथ घुले यांनी बाळाला दाखल केल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळेल का, अशी विचारणा केली. त्यावर योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास किमान सहा दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील, असे डॉक्टरांनी सांगितल्याचा आरोप आहे. तापासाठी सहा दिवस रुग्णालयात दाखल राहण्याची अट कोणत्या नियमांत आहे, असा प्रश्न घुले यांनी उपस्थित केला. तसेच संबंधित शासन निर्णय दाखवण्याची मागणी केली.
यावर डॉक्टरांनी, ‘तुला यातले काय कळते? तुला कशाला GR पाहिजे आणि कशाला माहिती पाहिजे?’ असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर मारहाणही केल्याचा आरोप साईनाथ घुले यांनी केला आहे. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याच दरम्यान 103 ताप असलेल्या बाळाला कुटुंबासह रुग्णालयातून बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर घुले यांनी बाळाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, मंगळवारी सकाळी त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत आपल्यासोबत घडलेला प्रकार उघड केला. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर केजमधील या घटनेने खळबळ उडाली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा उद्देश गरजू रुग्णांना उपचार मिळावेत हा असताना, योजनेच्या नावाखाली रुग्णालयात दाखल राहण्याच्या अटी घातल्या जात असल्याचा आरोप गंभीर आहे. आरोग्यसेवेसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात रुग्णांऐवजी आर्थिक हिताला प्राधान्य दिले जात आहे का, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.
या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती आहे. बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील आरोग्यसेवेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी होत आहे.
Comments are closed.