राज्यातील एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द

मुंबई : महायुती सरकारच्या काळात सुरू झालेल्या राज्यातील कुठल्याही योजना बंद करण्यात आल्या नाहीत. मी मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळात सुरू झालेल्या योजना आजही सुरू आहेत. शिवभोजन थाळी असेल, आनंदाचा शिधा असेल किंवा लाडकी बहीण योजना (Ladki bahin yojana) असेल ह्या योजना आजही सुरू आहेत, यापुढे देखील सुरूच राहतील, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकेनाथ शिंडे (एकनाथ शिंदे) यांनी लाडक्या बहिणींना शब्द दिला आहे. राज्यातील एकही पात्र बहीण लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असा शब्दच एकनाथ शिंदेंनी एबीपी माझाच्या व्हिजन महाराष्ट्र या कार्यक्रमातून दिला. एबीपी माझाच्या व्हिजन महाराष्ट्र कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यामध्ये, उद्योग, मुंबईचा विकास, रोजगार, गावाकडची शेती, मुख्यमंत्रीपदावरुन नाराजी, शासनाच्या योजना, नागपूरचा हिंसाचार… या प्रश्नांवर उत्तरे दिली. तसेच, राज्यातील महायुती सरकार हे फेव्हिकॉल का जो है.. अजिबात तुटणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

आपण महायुतीमध्ये नाराज आहेत का, सातत्याने गावाकडे जाता याबाबत एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मी गावी जातोच. पण, काहीजण म्हणतात मी हेलिकॉप्टरने शेती करतो. कारने गावी जायला 6 ते 7 तास लागतात. या 6 ते 7 तासांत मी 10 हजार सह्या करु शकतो, सह्या करण्यात माझा रेकॉर्ड आहे. गर्दीमध्ये माणसांच्या पाठीवरही मी कागद धरुन सही करतो, या सहीने लोकांचे कामं करतो, वैद्यकीय विषय असेल किंवा इतर कामासाठी मी सह्या करतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले. मी गावाकडे शेती चांगलीच फुलवली आहे, गावात बांबूची शेतीही मी केली आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावाकडील शेतीचा अनुभव सांगितला. तसेच, 30 जून 2022 मी.. असे म्हणत एकनाथ शिंदेंनी आपण 2022 मध्येही राजकीय बांबू लावल्याचे सूचवले.

खंडणीखोरांना थेट तुरुंगात टाकणार

साताऱ्यात आपण न्यू महाबळेश्वर करत आहोत, आत्तापर्यंतचे हिल स्टेशन हे ब्रिटीशकालीन आहे. पण, आता आपलं सरकार करतंय हे पहिल्यांदाच होत आहे. आम्ही रस्ते धुतले, मुंबईची तिजोरी नाही धुतली, नालेसफाई केली, तिजोरीची नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातील उद्योजकांसाठी रस्ते, पाणी, वीज याची सोय करुन देत आहोत. उद्योजकांना जो त्रास देईल, तो तुरुंगात जाईल. खंडणीखोरांना आता आम्ही डायरेक्ट जेलमध्ये टाकणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

सर्वच योजना सुरू राहणार

राज्यातील सगळ्या योजना सुरू आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, ती आणखी सुरू आहे, पण काहीजण म्हणत होते ही योजना फसवी आहे, खरं नाही. पण, या योजनेसह, लेक लाडकी योजना, शासन आपल्या दारी व इतरही योजना सुरू आहेत. शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा ह्या योजनाही बंद नाहीत, त्या चालूच आहेत. ज्या पात्र बहिणी आहेत, त्यापैकी एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही, असा शब्दच एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहि‍णींना दिला. मात्र, निकषात बसणाऱ्या लाडक्या बहि‍णींनाच याचा लाभ मिळेल, जर चारचाकी गाडी असेल किंवा निकषात नसेल अशांनाच या योजनेचा लाभ मिळणार नाही, असेही ते म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=ra4kowukmoo

मुख्यमंत्रीपदासाठी कुठलीही नाराजी नाही

दरम्यान, निवडणुकांच्या निकालानंतर मीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन महायुती म्हणून आपण एकत्र आहोत. आपण मुख्यमंत्रीपदासाठी जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल असे म्हटले होते. त्यामुळे, आमच्यात मुख्यमंत्रीपदासाठी कुठलीही नाराजी नाही. मुख्यमंत्री पदापेक्षा राज्यातील लाडक्या बहि‍णींचा लाडका भाऊ ही माझी सर्वात मोठी ओळख आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसायला मी तो नव्हे, मी एकनाथ शिंदे आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली.

हेही वाचा

आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार ‘लय भारी’

अधिक पाहा..

Comments are closed.