ठाकरेंनी अंबादास दानवेंचं नाव जाहीर करताच भाजपने पत्ता उघडला; विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026: विधान परिषद निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे (Ambadas Danve) आज सकाळी 11 वाजता विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्धव ठाकरेंऐवजी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने काँग्रेस पक्षात नाराजी आहे. त्यामुळे काँग्रेसनंही आता उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. (Mahavikas Aghadi vs Mahayuti)
दिल्लीतून काँग्रेसचा एबी फॉर्म मुंबईला पाठविण्यात येणार आहे. श्रीनिवास बिक्कड फॉर्म घेऊन मुंबईला येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसंच राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा होता तसाच पाठिंबा आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसला द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार असून त्यांची 10 मतं मिळवण्याचाही प्रयत्न करणार असल्याचं कळतंय. उद्धव ठाकरेंनीच पुन्हा ही निवडणूक लढवावी अशी काँग्रेस आणि शरद पवार गटाची आग्रही भूमिका होती. मात्र मित्र पक्षांना याविषयी अंधारात ठेवण्यात आल्याचा सूर काँग्रेसनं आळवलाय. त्यामुळे महाविकास आघाडीत राजकीय हेवेदावे सुरु झाल्याचं दिसून येत आहे (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
अंबादास दानवेंचं नाव जाहीर करताच भाजपने पत्ता उघडला- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
एकमेव जागेसाठी उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षात, वादाची ठिणगी पडलेली असताना आता भाजपने विधान परिषद निवडणुकीत सातवा उमेदवार देण्यासाठी कंबर कसली आहे. कालच सहा उमेदवार जाहीर करणार भाजप, अतिरिक्त उमेदवार देण्याबाबत केंद्रीय पक्ष पातळीवर चर्चा करण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने महाविकास आघाडीत अंतर्गत वाद सुरू झाला आहे आणि याच वादाचा फायदा उचलण्याच्या तयारीत भाजप आहे.
भाजपचा सातवा उमेदवार निवडून येण्याची शक्यता- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
सत्तेत असलेली राष्ट्रवादी आणि भाजपकडे अतिरिक्त मतांचा कोटा आहे, त्यातच नाराजीवरून महाविकास आघाडीतली काही मतं फोडण्यात भाजपला यश आलं. तर नक्कीच भाजपचा सातवा उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडूनही तिसरा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु असल्याचं कळतंय. शिवसेनेच्या बैठकीला नुकतीच सुरुवात झालीय. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध न होण्याची शक्यता बळावली आहे.
भाजपकडून विधानपरिषदेसाठी 6 उमेदवारांची नावं जाहीर- (BJP Candidate Vidhan Parishad Election 2026)
भाजपने विधानपरिषदेसाठी 6 उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर भाजपने अधिकृतपणे महाराष्ट्रातील 5 विधानपरिषदांच्या जागेसाठी पाच नावांची घोषणा केली. तर, विधानपरिषदेच्या एका पोटनिवडणुकीसाठी एक म्हणजेच एकूण 6 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, प्रज्ञा सावंत यांचा समावेश आहे.
विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा- (Vidhan Parishad Election 2026)
विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांची नाव समोर आली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. (BJP Shivsena NCP Candidate List Vidhan Parishad Election 2026)
विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
- निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
- उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
- उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
- मतदानाची तारीख: 12 मे 2026
- मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
- मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
- निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.