प्रभागरचनेवरुन महायुतीत वादाची ठिणगी, नवी मुंबईत भाजपची नाराजी, पुण्यात राष्ट्रवादीची कोंडी
पुणे : आगामी महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पुणे आणि नवी मुंबईत मित्र पक्षांमध्येच कलगीतुरा रंगू लागलाय . नवी मुंबईतील प्रभाग रचना नगर रचना विभागाने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अनुकूल ठरेल अशा पद्धतीने तयार केल्याचा आरोप मंत्री गणेश नाईक यांनी केलाय.तर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातील प्रभाग रचनेत आपली कोंडी झाल्याचं म्हटलंय. त्यामुळे राज्यातील इतर महापालिकांच्या प्रभाग रचनांचे आराखडे प्रकाशित झाल्यावर मित्र पक्षांच्या एकमेकांबद्दल काय प्रतिक्रिया उमटतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे .
नवी मुंबईवर गेली कित्येक दशकं एकहाती सत्ता राखणाऱ्या गणेश नाईकांना आगामी महापालिका निवडणुकीबद्दल मात्र चिंता वाटू लागलीय . ही चिंता दुसऱ्या कोणी नाही तर मित्रपक्षाचे नेते असलेल्या एकनाथ शिंदेनी वाढवल्याचा नाईकांचा दावा आहे. नवी मुंबईतील या प्रभाग रचनेवर शेजारच्या ठाण्याचा प्रभाव असून एकनाथ शिंदेनी त्यांच्याकडे असलेल्या नगर विकास खात्याचा उपयोग करून भाजपला अडचणीत आणणारी प्रभाग रचना करून घेतल्याचा नाईकांचा सूर आहे.
111 सदस्यीय नवी मुंबई महापालिकेत चार सदस्यांचे 27 ते तीन सदस्यांचा एक असे एकूण 28 प्रभाग असणार आहेत.या प्रभागांची रचना नियमाला धरून नसल्याची तक्रार गणेश नाईकांच्या अनेक समर्थकांनी केलीय.त्यानंतर गणेश नाईकांनी रविवारी त्यांच्या समर्थकांची आणि माजी नगरसेवकांची बैठक घेतली.
नवी मुंबईत जो आरोप भाजपकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबद्दल करण्यात येतोय तोच आरोप पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप बद्दल करण्यात येतोय . पुण्यातील प्रभाग रचनेत अजित पवारांच्या शिलेदारांची ठरवून कोंडी करण्यात आल्याचा आरोप माजी महापौर आणि अजित पवारांचे विश्वासू दत्तात्रय धनकवडे यांनी केलाय. पुण्यात 165 नगरसेवकांसाठी चार सदस्यांचे 40 प्रभाग तर पाच सदस्यांचा एक असे एकूण 41 प्रभाग असणार आहेत. ही प्रभाग रचना करताना नैसर्गिक सीमांचा विचार केला नसून राष्ट्रवादीचे अनेक माजी नागरसेवकी निवडणुकी आधीच स्पर्धेतून बाद होणार आहेत .अनेक माजी नगरसेवकांना एकाच प्रभागातून लढवण्याचा डाव असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे .
महायुती- मविआचे नेते काय म्हणाले?
राष्टवादीच्या पुण्यातील शिलेदारांनी या प्रभाग रचनेबद्दल आक्षेप घेत अजित पवारांकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलंय . मात्र स्वतः अजित पवारांनी मात्र आहे, त्या प्रभागांमध्ये निवडणूक लढवायला पाहिजे असं म्हणत हात वर केलेत.
एकीकडे महायुतीतील मित्र पक्षांमध्ये प्रभाग रचनेवरून कलगीतुरा सुरु झालेला असताना महाविकास आघाडीकडून य प्रभाग रचनांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय . आमदार रोहित पवार यांनी गणेशोत्सवानंतर याबद्दल व्हाईट पेपर काढणार असल्याच म्हटलंय. तर, खासदार सुप्रिया सुळे यांनी जरी अन्याय झाला तरी लढलं पाहिजे अशी भूमिका घेतलीय.
नवी मुंबई आणि पुण्य पाठोपाठ मुंबईत देखील उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून प्रभागरचने बद्दल नाराजीचे सूर उमटू लागलेत. त्याबद्दल मंत्री आशिष शेलार यांनी टीका केलीय . ठाकरेंचा पक्ष मुंबईत रडगाणं गातोय असं त्यांनी म्हटलंय. मात्र, नवी मुंबईतील प्रश्न तिथल्या भाजप नेत्यांनी मांडले पाहिजेत, असं आशिष शेलार म्हणतायत.
प्रभाग रचनांचे नकाशे प्रकाशित झाल्यानंतर हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी काही दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत सादर झालेल्या हरकती आणि सूचना ठिकठिकाणच्या महापालिकांडून नगर विकास विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत.एका अर्थाने प्रभाग रचनेचा निर्णय पुन्हा एकदा नगर विकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात असणार आहे . महायुतीतील वरिष्ठ नेते यातून कसे मार्ग काढतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे .
प्रभाग रचनेवर आक्षेप विरोधी पक्षातील नेते तर घेतच असतात.पण, आता सत्तेत असलेले घटक पक्षच एकमेकांवर टीका करू लागलेत. त्यामुळं निवडणुका जाहीर होण्याआधीच वातावरण तापणार आहे. पण, राजकीय पक्षांच्या फायद्या – तोट्यांपेक्षा सर्व सामान्यांना या प्रभाग रचनांमुळे काय फरक पडणार आहे , त्यांचे प्रश्न सुटणार आहात की आणखी जटील होणार आहेत याचा विचार करण्याची गरज आहे.
आणखी वाचा
Comments are closed.