एका रात्रीत 110 टनचे तीन गर्डर उभारले, 10 तासांचा ब्लॉक आणि 110 कामगार; मेट्रो-6च्या कामातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण
मुंबईत मेट्रो लाईन-6साठी (पिंक लाईन) पश्चिम रेल्वेवरील गर्डर उभारण्याचे काम यशस्वी झाले. या वेळी तीन 110 टनाचे गर्डर एका रात्रीत उभारणे शक्य झाले आहे. जोगेश्वरी आणि राम मंदिर रेल्वे स्थानकांदरम्यान हे काम करण्यात आले.
एमएमआरडीएकडून मेट्रो लाईन-6चे काम सुरू आहे. याअंतर्गत जोगेश्वरी आणि राम मंदिर स्थानकांदरम्यान घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकदरम्यान हे काम पार पडले. 2 आणि 3 मे 2026च्या मध्यरात्री, राम मंदिर ते जोगेश्वरी स्थानकादरम्यान प्रत्येकी 32 मीटर लांबीचे आणि सुमारे 110 मेट्रिक टन वजनाचे असे तीन गर्डर यशस्वीरीत्या बसविण्यात आले. या कामासाठी सहाव्या लाईन आणि शंटिंग लाईनवर 10 तासांचा ट्रफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला होता. तसेच अप फास्ट लाईन आणि पाचव्या लाईनवर अनुक्रमे 3 तास आणि 5 तासांचा ब्लॉक घेण्यात आला. विशेष म्हणजे नियोजित वेळेपेक्षा तब्बल 30 मिनिटे आधी हे काम पूर्ण करण्यात आले.
- या संपूर्ण कामासाठी रेल्वे कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांसह एकूण 110 जणांची टीम कार्यरत होती. यात 600 टन क्षमतेचा एक व्रेन, 500 टन क्षमतेचे दोन व्रेन तसेच प्रत्येकी 500 टन क्षमतेचे दोन स्टँडबाय व्रेन, दोन हायड्रा, दोन जेसीबी, एक मटेरियल लिफ्टर आणि दोन टॉवर वॅगन अशा अत्याधुनिक यंत्रसामग्रींचा वापर करण्यात आला होता.
पिंक लाईन पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणार
पिंक लाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबई मेट्रो लाईन 6 मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणार आहे. हा मार्ग लोखंडवाला (स्वामी समर्थ नगर) ते विक्रोळी (पूर्व द्रुतगती महामार्ग) दरम्यान उभारण्यात येत असून, हा प्रवास मेट्रोमुळे 30-35 मिनिटांत पूर्ण होईल. 14.5 किलोमीटर लांब उन्नत मार्गिकेवर 13 स्थानके आहेत.
Comments are closed.