कोण आहे मानव सुथार? 129 विकेट्स घेणाऱ्या युवा अष्टपैलूची टीम इंडियात एंट्री
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात 23 वर्षीय डावखुरा फिरकी अष्टपैलू मानव सुथारने भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कुलदीप यादवच्या हस्ते त्याला कसोटी कॅप प्रदान करण्यात आली. मानव सुथार हा भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणारा 319वा खेळाडू ठरला आहे.
राजस्थानच्या श्रीगंगानगर येथील मानव सुथार देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थान संघाचे प्रतिनिधित्व करतो. तसेच तो आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा भाग आहे. डावखुरी फिरकी गोलंदाजी आणि खालच्या फळीत उपयुक्त फलंदाजी करण्याच्या क्षमतेमुळे तो गेल्या काही वर्षांपासून भारतातील सर्वात आशादायक रेड-बॉल खेळाडूंपैकी एक मानला जात आहे.
रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात आल्यानंतर निवडकर्त्यांनी मानव सुथारला संधी देत भविष्यातील फिरकी अष्टपैलू पर्यायाची चाचपणी करण्याचा निर्णय घेतला.
मानव सुथारने देशांतर्गत क्रिकेट आणि इंडिया ‘A’ संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करत राष्ट्रीय संघाचे दार ठोठावले. 2022-23 रणजी ट्रॉफी हंगामात त्याने केवळ सहा सामन्यांत 39 बळी घेत राजस्थानचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज होण्याचा मान मिळवला.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 29 सामन्यांत 129 बळी आणि 945 धावा आहेत. ऑस्ट्रेलिया ‘A’ विरुद्धच्या अनधिकृत कसोटी मालिकेतही त्याने प्रभावी गोलंदाजी करत 107 धावांत 5 बळी घेतले होते. तसेच 2023 एसीसी इमर्जिंग टीम्स आशिया कपमध्येही त्याने चमकदार कामगिरी केली होती.
टॉस जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार शुबमन गिल म्हणाला, “आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वातावरणात उष्णता आणि आर्द्रता आहे. जसजसा सामना पुढे जाईल तसतशी खेळपट्टी संथ होत जाईल. या मैदानावर खेळत मी मोठा झालो आहे, त्यामुळे येथे भारताचे नेतृत्व करणे माझ्यासाठी विशेष क्षण आहे. मानव सुथार आज कसोटी पदार्पण करत आहे.”
टॉस गमावल्यानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार हजमतुल्लाह शाहिदी म्हणाला, “आम्हालाही प्रथम फलंदाजी करायची होती. खेळपट्टी चांगली दिसत आहे. आम्ही या आव्हानासाठी पूर्णपणे तयार आहोत. काबूलमधील आमचे तयारी शिबिर उत्तम झाले. आम्ही या सामन्यात तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंना संधी दिली आहे. नांगेयालिया खरोटे या सामन्यात पदार्पण करत आहे.”
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात झालेल्या मागील कसोटी मालिकेत भारताला 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या सामन्यात दमदार पुनरागमन करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरला आहे. त्याचबरोबर साई सुदर्शन आणि मानव सुथार यांसारख्या युवा खेळाडूंवरही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Comments are closed.