म्हाडाची पाच हजार घरांची बंपर लॉटरी; ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई-विरारमध्ये घर घेण्यासाठी संधी
म्हाडाच्या घराचे स्वप्न पाहणाऱयांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, वसई, विरार येथील तब्बल पाच हजार घरांच्या विक्रीसाठी ऑगस्टच्या शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
कमी किमतीत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य म्हाडाच्या सोडतीची आतुरतेने वाट पाहत असतात. दरवर्षी प्रत्येक मंडळाची एक तरी लॉटरी काढण्याचा म्हाडाचा विचार आहे. त्यानुसार आता म्हाडाच्या कोकण मंडळाने सुमारे पाच हजार घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षी कोकण मंडळाने 5,285 घरांची लॉटरी काढली होती यासाठी अनामत रकमेसह तब्बल 1 लाख 54 हजार 427 अर्ज प्राप्त झाले होते. त्यामुळे यंदाही रेकॉर्डब्रेक अर्ज प्राप्त होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
घरांची जुळवाजुळव सुरू
सध्या म्हाडाकडे स्वतः बांधलेल्या घरांचा साठा मर्यादित असला तरी खासगी विकासकांकडून मिळालेली जवळपास एक हजार घरे उपलब्ध आहेत. याशिवाय ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि वसई-विरार परिसरातून 20 टक्के योजनेअंतर्गत आणखी सुमारे चार हजार घरे उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. घरांची जुळवाजुळव पूर्ण होताच सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.
Comments are closed.