स्पेनशाह! अर्जेंटिनाच्या खेळाडूंचा मैदानात राडा, स्पेनचा 16 वर्षांचा दुष्काळ संपला; अर्जेंटिनाला नमवत पटकावले जगज्जेतेपद, टोरेसचा अतिरिक्त वेळेत निर्णायक गोल
मेस्सीची जादू चालणार की यमाल धमाल करणार याची शिगेला पोहोचलेली उत्सुकता आता स्पेनच्या लाल रंगात न्हाऊन निघत आहे. कारण स्पेनने जेतेपदाच्या लढतीत गतविजेत्या अर्जेंटिनाचा अतिरिक्त वेळेत 1-0 असा पराभव करत तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा फिफा वर्ल्ड कपच्या झळाळत्या करंडकावर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. फेरान टोरेसने 106व्या मिनिटाला केलेला निर्णायक गोलने स्पेनचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला, तर जेतेपद राखण्यात अपयश आल्याने फुटबॉलचा महानायक मेस्सीच्या अश्रूंचा बांध फुटला. 2010 नंतर प्रथमच विश्वचषक जिंकणाऱ्या स्पेनने युरोपियन अजिंक्यपदानंतर विश्वचषकही जिंकत जागतिक फुटबॉलवर आपले वर्चस्व सिद्ध केले.
अर्जेंटिनाचा बचाव कोसळला
मेस्सीच्या नेतृत्वाखालील संघाला स्पेनच्या भक्कम बचाव फळीसमोर एकही प्रभावी आक्रमण उभारता आले नाही. दुसरीकडे स्पेनने सतत हल्ले चढवत अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझची कठोर परीक्षा घेतली. नियमित वेळेच्या अखेरीस एन्झो फर्नांडेझने पॉऊ क्युबार्सीवर केलेल्या धोकादायक फाउलसाठी दुसरे पिवळे कार्ड मिळवले आणि त्याला लाल कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाला दहा खेळाडूंसह खेळावे लागले.
टोरेसचा सुवर्णक्षण
अतिरिक्त वेळेत निको विल्यम्स आणि मिकेल मेरिनो यांनी सतत आक्रमणे करत अर्जेंटिनावर दबाव कायम ठेवला. अतिरिक्त वेळेच्या सुरुवातीलाच निको विल्यम्सचा हेडर एमिलियानो मार्टिनेझने अप्रतिमरीत्या रोखला. मात्र, अखेरीस 106व्या मिनिटाला फेरान टोरेसने मधल्या भागातून आलेल्या चेंडूवर जोरदार हाफ-व्हॉली मारत गोल नोंदवला आणि स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
स्पर्धेतील प्रमुख पुरस्कार
सोनेरी बूट : कायलियन एमबाप्पे: (फ्रान्स)
सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू : पॉ क्यूबार्सी (स्पेन)
गोल्डन हातमोजे : उनाई सायमन (स्पेन)
बॅलन डी'ऑर (स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू) : रोड्री (स्पेन)
Comments are closed.