तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. क्षीरसागरांचा नायब तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल

मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बीडमधील (Beed) दहशत आणि गुंडगिरीचा पर्दाफाश झाला असून संतोष देशमुख हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हाच येथील गुंडांचा म्होरक्या असल्याचं समोर आलं आहे. तर, वाल्मिक कराड आपला निकटवर्तीय असल्याचे मान्य केलेल्या धनंजय मुडेंना देखील आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यामुळे, बीडमधील गुंडगिरी सध्या राज्यात चर्चेत असून या गुंडगिरीला प्रोत्साहन देण्याचे किंवा पोसण्याचे काम जिल्ह्यातील राजकीय पक्षाच्या नेत्यांकडूनच होत असल्याचे समोर येत आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या जवळचा असून आता खोक्याभाई म्हणून व्हायरल व्हिडिओतील युवक हा आमदार धस यांचा कार्यकर्ता असल्याचे त्यांनीच मान्य केलंय. त्यानंतर, आता आमदार संदीप क्षिरसागर (सँडिप क्षिरसागर) यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून नायब तहसीलदारांना थेट धमकी देत असल्याचं ऐकायला मिळत आहे. तसेच, माझ्या मतदारसंघाचा चार्ज तुम्ही मला न विचारता घेतला, माझ्या मतदारसंघात तमाशा करू नका, तुम्हाला सांगतोय, अशी धमकी क्षीरसागर यांनी दिल्याचे ऐकायला मिळत आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांची बीडमधील नायब तहसीलदारांना दमदाटी आणि धमकावण्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बीडचे नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांना ग्रामरोजगार सेवकाबद्दल तक्रार करू नको.. म्हणून क्षीरसागर बोलत आहेत. 2023 च्या जुलै महिन्यात हा प्रकार घडल्याची माहिती असून ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. तहसीलदार महोदयांना आमदार संदीप क्षीरसागर यांनी फोनवरुन चांगलाच दम भरल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांने केलेल्या चुकीच्या कामाबद्दल विचारणा करत क्षीरसागर यांनी थेट धमकी दिल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

काय आहे ऑडिओतील संवाद

सुरेंद्र डोके तहसीलदार – हॅलो साहेब, नमस्कार

संदीप क्षीरसागर – पीए सर नमस्ते नमस्ते भैया साहेब बोलणार आहेत

सुरेंद्र डोके तहसीलदार – नमस्कार साहेब

संदीप क्षीरसागर – डोके साहेब उंब्रद खालसाच्या विषयात तुम्ही ग्राम रोजगार सेवकाला का नोटीस काढली?

सुरेंद्र डोके तहसीलदार – साहेब त्याची तक्रार आली होती

संदीप क्षीरसागर – कशाची तक्रार त्याची सही बीयी काही नाही

सुरेंद्र डोके तहसीलदार – त्यात सुनावणी घेतो आणि पुढची प्रोसेस करतो

संदीप क्षीरसागर – एक तर तुम्ही माझ्या मतदारसंघात चार्ज मला न विचारता घेतला आहे

सुरेंद्र डोके तहसीलदार – साहेब त्याच्यात तक्रार आली होती त्याची चौकशी करावी लागेल

संदीप क्षीरसागर – एक तर तुम्ही चार्ज मला न विचारता घेतला आहे, तुम्हाला असं वाटत आहे सहा महिन्यात सरकार आली तर तू महाराष्ट्रात कुठेही असला तर सोडणार नाही सांगतो. तू हे माझ्या मतदारसंघात तमाशे करू नकोस

सुरेंद्र डोके तहसीलदार – साहेब चौकशी करतो प्रोसेसर करून घेतो ना

संदीप क्षीरसागर – तुझे नाटक मीच बघेल बर का, कुठेही गेला तरी महाराष्ट्राच्या बाहेर तर जाणार नाही ना तू आ… या विषयात रोजगार सेवकाला कुठेही अडचण आली नाही पाहिजे.. बर का…

सुरेंद्र डोके तहसीलदार – करून घेतो.. करून घेतो….

दरम्यान, अशा आशयाचा संवाद या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत असून गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये राजकीय नेत्यांच्या किंवा त्यांच्या निकटवर्तीयांच्या ऑडिओ , व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. त्यामुळे, या व्हायरल क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही. मात्र, संबंधित घटनेची इतंभू माहिती देण्यात येत आहे.

https://www.youtube.com/watch?v=Q03J6ai3snu

हेही वाचा

धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

अधिक पाहा..

Comments are closed.