नातवाला बॉम्बे स्कॉटिशपेक्षा बालमोहन विद्या मंदिरात दाखला द्या; भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार


मुंबई : भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंह यांनी मुंबईतील (Mumbai) कार्यक्रमात आयआयटी बॉम्बे या संस्थेसंदर्भाने केलेल्या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा हिंदी आणि मराठी व मुंबई-गुजरात वाद रंगला आहे. मनसेच्या नेत्यांकडून मंत्री महोदयांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देत टीका केली जात आहे. स्वत: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही ट्विटरवर पोस्ट लिहून संबंधित विषयावर भाष्य केलं. त्यानंतर, आता भाजप नेत्यांकडून राज ठाकरेंवर पलटवार केला जात आहे. आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केल्यानंतर आता भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम (Amit satam) यांनी राज ठाकरेंना आवाहन केलं आहे.

आयआयटी बॉम्बेचं नाव बदलून मुंबई केलं नाही, याचा आनंद आहे, असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे. मुंबई जी मराठी माणसाची होतीच, तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे, अशी खरमरीत टीका राज ठाकरे यांनी केली आहे. त्यावरुन, आता भाजप नेत्यांनीही पलटवार केला आहे. मुंबईत भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी थेट नातवाच्या शाळेचा दाखला दिला.

नातवाला बालमोहन विद्या मंदिरात दाखला द्या

‘आपल्या नातवाला बॉम्बे स्कॉटिशपेक्षा बालमोहन विद्या मंदिरात दाखला द्या’ असे म्हणत अमित साटम यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला. ‘मुंबईबद्दल आम्हाला शिकवू नका, ‘मुंबईचे नामांतर होताना भाजपच्याच नेत्याच्या पुढाकाराने बॉम्बेचे मुंबई झाले होते. तुम्ही तुमच्या मुलांना बॉम्बे स्काॉटिश शाळेत शिकवलं, 11 वी ला मराठीऐवजी जर्मन भाषा शिकवली, हेच का तुमचे मराठी प्रेम, अशा शब्दात अमित साटम यांनी राज ठाकरेंना सवाल केले आहेत.

राज ठाकरेंची पोस्ट कल्पना विस्ताराचा नमुना

राज ठाकरेंची पोस्ट ही कल्पना विस्ताराचा उत्तम नमुना आहे. जितेंद्र सिंह जे बोलले त्याचे अनव्हेरिफाईड रिपोर्ट आहेत. त्यावरुन ‘मुंबई तोडणार’, ‘मुंबई गुजरातला जोडणार’, या कल्पनाविस्ताराला मुंबईची जनता भुलणार नाही. राज ठाकरे साहेब विकासावर बोला. मुंबईचं कसं वाट्टोळं केलंय, मराठी माणूस तुम्ही कसा मुंबईतून हद्दपार केलाय यावर बोला. मुंबईकर आणि मराठी जनता महायुतीला महापालिकेत निवडून देणार आहे, असे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं.

हेही वाचा

राणीच्या बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, श्वसननलिकेत हाड अडकलं, उपचार न मिळाल्याने जीव सोडला?

आणखी वाचा

Comments are closed.