मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 4 कोटी 20 लाख रुपयांचं सोनं जप्त, तीन जणांना अटक

मुंबई क्राईम न्यूज : मुंबईत आज मोठी कारवाई करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. 24 कॅरेट शुद्धतेचे 2.6 किलो परदेशी बनावटीचे सोने जप्त केले आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 4.20 कोटी रुपये आहे.

नवी मुंबईतील एका सराफाचा या तस्करीत सक्रिय सहभाग असल्याचे उघड

डीआरआयला दुबईहून कार्यरत असलेल्या तस्करी रॅकेटबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनंतर दोन प्रवाशांना विमानतळावर अडवण्यात आले आहे. त्यांच्या अंगझडतीदरम्यान मेणाच्या स्वरुपातील सोन्याची धूळ असलेली दोन पिशव्या आढळून आल्या. या सोन्याचे एकूण वजन 2,600 ग्रॅम होते. तपासादरम्यान नवी मुंबईतील एका सराफाचा या तस्करीत सक्रिय सहभाग असल्याचे उघड झाले. त्यानुसार दोन्ही प्रवासी आणि नवी मुंबईतील सराफ अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. सीमाशुल्क कायद्यान्वये सोने जप्त करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांवर FDAची धडक कारवाई सुरु

प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांवर FDAची धडक कारवाई सुरु आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यभर 40 ठिकाणी छापेमारी केली आहे. 30 मे आणि 31 मे रोजी झालेल्या कारवाईत 32 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 24 एफआयआर दाखल झाले आहेत. 26 आस्थापना सील केल्या आहेत. तर 12.16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोकण विभागात सर्वाधिक 16 आरोपी अटकेत आहेत. तर छत्रपती संभाजीनगरात 11 कारवाया, 7 जण अटकेत आहेत. पुणे, नाशिकमध्ये वाहनांसह मोठी कारवाई केली आहे. 3 वाहने जप्त; किंमत 2.60 लाख रुपये जप्त केले आहेत. BNS कलम 123, 223, 204, 275 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गतही कठोर कारवाई केली आहे. अन्नभेसळीच्या तक्रारींसाठी नवीन ॲप आणि टोल-फ्री क्रमांक लवकरच येणार आहे. आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. प्रतिबंधित गुटखा विक्रीविरोधातील मोहीम आणखी तीव्र होणार आहे.

बोरिवली आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपिक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

बोरिवली येथील प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या बसवर प्रादेशिक परिवहन विभाग, बोरिवली यांनी 26500 रुपयांचा दंड आकारला होता. हा दंड कमी करून देण्यासाठी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक मिथुन विलास आडे यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम 4 हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर 1 जून 2026 रोजी सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान मिथुन आडे यांनी तक्रारदाराकडून 4 हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

आणखी वाचा

Comments are closed.