एक्स्प्रेस वेवर दोन भीषण अपघात; ट्रेलरचा चक्काचूर, चालकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्झिट परिसरात आज दोन भीषण अपघात झाले. त्यात ट्रेलरचा संपूर्ण चक्काचूर झाला असून चालकाचा जागीच मृत्यू झाला तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.

खोपोली एक्झिट परिसराजवळ सकाळी ९ वाजता पहिला अपघात झाला. यात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक्झिटवरील पुलाच्या उजव्या बाजूला सुसाट ट्रक वेगाने धडकला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला.

सकाळी ९.३० वाजता दुसरा अपघात झाला. या अपघातात पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकला ट्रेलरने मागून जोरात धडक दिली. बोरघाटातील खोपोली बायपासजवळ ट्रेलरचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. या अपघातात ट्रेलरचा चक्काचूर झाला. चालक गंभीररीत्या जखमी होऊन ट्रेलरमध्येच अडकला, त्यातच त्याचा मृत्यू झाला. सिद्धार्थ राजा (२७, रा. उत्तर प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या ट्रेलर चालकाचे नाव आहे. जखमी झालेल्या ट्रक चालकाचे नाव गुरुनाथ खापरे (३८) असे आहे.

एक्स्प्रेस वे अर्धा तास बंद, प्रचंड ट्रॅफिककोंडी

या भीषण अपघातानंतर संपूर्ण एक्स्प्रेस वे अर्धा तास बंद ठेवण्यात आला. त्यामुळे मोठी वाहतूककोंडी झाली. या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, आयआरबी टीम आणि हेल्प फाऊंडेशनचे सदस्य तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून पुढील उपचारासाठी कळंबोलीतील एमजीएम रुग्णालयात हलवले. महामार्ग वाहतूकीला बंद ठेवल्याने प्रचंड ट्रॅफिककोंडी झाली होती.

Comments are closed.