करंजा खाडीत तारली माशांचा ‘बॅले डान्स’दोन किलोमीटरपर्यंत अद्भुत नजारा
खाण्यासाठी रुचकर अशी ओळख असलेले तारली मासे शुक्रवारी करंजा खाडीत मोठ्या प्रमाणावर पसरले होते. करंजा खाडी ते रेवस, काश्याचा खडक अशा सुमारे दोन किलोमीटर सागरी समुद्रात या तारली माशांचा अद्भुत नजारा पाहायला मिळत होता. एकाच वेळी हजारोंच्या संख्येने माशांचा सुरू असलेला ‘बॅले डान्स’ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
थंडीत तारली मासे मोठ्या प्रमाणावर खाडीत येतात. मात्र इतक्या प्रचंड संख्येने पहिल्यांदाच करंजा बंदर ते रेवस खाडीपर्यंतच्या दोन किलोमीटर परिसरात शुक्रवारी तारली मासे पाहायला मिळाल्याची माहिती मच्छीमार बांधवांनी दिली. सायंकाळच्या सुमारास करंजा जेट्टीवर मोठ्या प्रमाणावर तारली मासे उसळी घेताना दिसत होते. जेट्टीवर उसळी घेणाऱ्या जिवंत तारली माशांना पकडण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
थंडीचा मोसम पोषक
तारली मासे कोकणात सार्डील आणि कांटा या नावानेही ओळखले जातात. थंडीच्या मोसमात ते कोकणातील जयगड, देवगड, सिंधुदुर्गच्या अथांग पसरलेल्या सागरी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. हा मोसम त्यांच्यासाठी पोषक असतो असे करंजा येथील मच्छीमार व्यावसायिक रमेश नाखवा यांनी सांगितले.
Comments are closed.