गुजरातीचा निकाल 100 टक्के, राजभाषा मराठीत 80 हजार नापास
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च 2026 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत गुजराती भाषा घेऊन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल 100 टक्के लागला असताना महाराष्ट्राची राजभाषा मराठीमध्ये मात्र तब्बल 80 हजार विद्यार्थी नापास झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. गुजराती भाषा निवडून परीक्षा दिलेले सर्व 302 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्राची राजभाषा मराठीची पीछेहाट चिंतेचा विषय बनला आहे.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात दहावीसाठी एकूण 64 विषयांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू, कन्नड, सिंधी आणि तेलुगु अशा आठ माध्यमांसाठी विद्यार्थ्यांनी मंडळाकडे नोंदणी केली होती. यानुसार गुजराती द्वितीय आणि तृतीय भाषेसाठी नोंदणी केलेले सर्व 302 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मराठी विषयासाठी सुमारे 10 लाख 87 हजार 699 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील 80 हजार 803 विद्यार्थी नापास झाले आहेत.
भाषा उत्तीर्ण टक्केवारी
- मराठी 92.59
- हिंदी ८९.६९
- इंग्रजी 97.88
- गुजराती १००
- संस्कृत ९९.२१
- उर्दू २५
दुसऱ्या, तिसऱ्या भाषेतही पिछाडी
- दहावीसाठी द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून मराठी भाषा निवडली होती. यामध्ये एकूण 4 लाख 13 हजार 917 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
- यातील 13 हजार 741 विद्यार्थी नापास झाले. म्हणजेच एकूण 94 हजार 544 विद्यार्थी मराठीत नापास झाल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.
इंग्रजी भाषा व इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढवण्याच्या आणि शिक्षणाचे खासगीकरण करण्याच्या नादात मुलांना एकही भाषा नीट अवगत होणार नाही, हे शास्त्रीय सत्य आहे. मराठीकडे होणाऱया दुर्लक्षामुळेच आता मातृभाषा मराठीच्या परीक्षेत अपयश मिळत असल्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे मराठी जपण्यासाठी ठोस निर्णय घ्यायला हवेत. – श्रीपाद जोशी, मराठी हित चळवळ संयोजक
Comments are closed.