पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे : महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी असलेल्या पुण्यात (Pune) गेल्या काही महिन्यात वाढती गुन्हेगारीच्या बातम्या हा चिंतेचा विषय बनली आहे. विशेष म्हणजे, आजवर सोनं, चांदी, मोबाईल, महागड्या गाड्या अशा अनेक मौल्यवान आणि किंमती वस्तू चोरीला गेल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील किंबहुना पहिल्या असतील. पण, आता अनपेक्षित अशी चोरी चक्क पुण्यातून झाली आहे. खरंच पुण्यात असं होणार आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला मात्र हे खरंय. आता, पुण्यात चक्क 800 जिवंत कोंबड्या (hen) चोरीला गेल्या आहेत. कधी कशाची चोरी होईल याचा नेम नाही, त्यामुळे पुण्यासारख्या शहरात आता माणसं सोडा प्राणी पण सुरक्षित नाहीत, असा प्रश्न किंवा टोमणा पुणेकर नक्कीच विचारत आहेत.

एका बाजूला भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने चोरल्याची घटना पुण्यात ताजी असतानाच पुण्यातील एका पार्किंगमधील वाहनातून 800 जिवंत कोंबड्या चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सगळ्या प्रकार पुणे शहरातील कॅम्प भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये घडला. या प्रकरणी धनंजय उरड (वय 50) यांनी पोलिसात दिल्यावर लष्कर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 13 जुलै सोमवारी पहाटे कॅम्प भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये घडला. 50 वर्षीय तक्रारदार एका चिकन सेंटरमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी करतात. पुण्यातील विविध चिकन विकणाऱ्या दुकानांना याच सेंटर मधून बॉयलर कोंबड्या पुरविल्या जातात. या मोठ्या चिकन सेंटरमध्ये फलटण येथून त्यांची कोंबड्यांची गाडी पुण्यात येते. दरम्यान, नेहमीप्रमाणे रविवारी रात्री हजारोंच्या संख्येने कोंबड्या घेऊन सेंटरची गाडी छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये आली आणि पार्किंग म्हणून चालकाने गाडी पार्किंगमध्ये पार्क केली. संबंधित टेम्पो चालकाने गाडी पार्क केली आणि झोपण्यासाठी तिथून निघून गेला. हीच संधी शोधत अज्ञाताने या गाडीतील तब्बल 800 जिवंत कोंबड्या चोरल्या. झोप झाल्यानंतर टेम्पो चालक आले आणि त्यांनी गाडीमध्ये असलेल्या कोंबड्यांवर नजर फिरवली तर गाडीतून कोंबड्या गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी तातडीने ही बाब सबंधिताना सांगितली आणि थेट पोलिसात धाव घेतली.

दरम्यान, प्रत्येक कोंबडीची किंमत सुमारे 200 रुपये असून, चोरट्यांनी 1 लाख 60 हजार रुपयांच्या कोंबड्या चोरुन नेल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पार्किंगमधून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा

पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयालाच सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं

Comments are closed.