IPL2026: राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरला डगआउटमध्ये फोन वापरणं पडलं महागात! बीसीसीआयकडून मोठी कारवाई

आयपीएल (IPL) 2026 दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याचे एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. राजस्थान रॉयल्सचे मॅनेजर रोमी भिंडर यांनी डगआउटमध्ये फोन वापरल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध गुवाहाटी येथील सामन्यात ही घटना घडली, ज्याची दखल घेत BCCI ने त्यांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र, त्यांना बंदी घालण्यापासून दिलासा मिळाला आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये भिंडर डगआउटमध्ये फोन वापरताना दिसले. नियमानुसार (Player and Match Officials Area) डगआउटमध्ये फोन वापरण्यास सक्त मनाई आहे. टीम मॅनेजर केवळ ड्रेसिंग रूममध्येच फोनचा वापर करू शकतात. या प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्यामुळे BCCI ने त्यांना ‘कारण दाखवा’ नोटीस बजावली होती. भिंडर यांनी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे फोन वापरल्याचे स्पष्टीकरण दिले होते, परंतु अँटी-करप्शन युनिट (ACSU) त्यांच्या उत्तराने समाधानी नव्हते.

बीसीसीआय (BCCI) सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले की, हे त्यांचे पहिलेच उल्लंघन असल्यामुळे त्यांच्यावर 1 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच त्यांना भविष्यात अधिक सावध राहण्याची चेतावणी देण्यात आली आहे. या घटनेतून इतर सर्वांनी धडा घ्यावा आणि खेळाची प्रतिमा जपण्यासाठी नियमांचे पालन करावे. हा वाद मिटल्यानंतर आता राजस्थान रॉयल्सचे लक्ष त्यांच्या पुढच्या सामन्याकडे आहे. त्यांचा पुढील सामना 19 एप्रिल रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून पुन्हा लयीत परतण्याचा टीमचा प्रयत्न असेल.

Comments are closed.