शेअर बाजारातील अस्थिरता वाढली; पाच दिवसात 2 लाख कोटी स्वाहा

जागतिक अशांतता, अस्थिरता आणि वाढत्या तणावाचा शेअर बाजारावरही परिणाम होत आहे. गेल्या आठवड्यात अमेरिका-इराणमध्ये चर्चा होणार असल्याची शक्यता होती. त्यामुळे बाजारात सकारात्मकता होती. मात्र, दोन्ही देशांकडून अधिकृत माहिती देण्यात येत नसल्याने गुंतवणूकदारांची निराशा झाली आणि बाजारात घसरणीला सुरुवात झाली. गेल्या पाच दिवसात 2 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. आता दोन्ही देशात थेट चर्चा होण्याची शक्यता कमी असल्याने बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

गेल्या आठवड्यातील शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे अनेक मोठ्या कंपन्यांना मोठे नुकसान झाले आहे. सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या बाजारमूल्यात घट झाली आहे. तर तीन कंपन्यांच्या गुंतवणूकदारांनी नफा कमावला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स पाच ट्रेडिंग दिवसांमध्ये १,८२९ अंकांनी, म्हणजेच सुमारे २.३३ टक्क्यांनी घसरला. रिलायन्स इंडस्ट्रीजपासून टीसीएसपर्यंतच्या सात कंपन्यांना २.०५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले.

गेल्या आठवड्यातील पाच ट्रेडिंग दिवसांमध्ये रिलायन्स-टीसीएसला सर्वात मोठे नुकसान झाले. शेअर बाजारातील घसरणीमुळे सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या बाजारमूल्यात घट झाली आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे, टाटा समूहाची आयटी कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ला सर्वात मोठे नुकसान झाले. केवळ पाच ट्रेडिंग दिवसांत तिचे बाजार भांडवल ८.६७ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले आणि गुंतवणूकदारांना ६६,६९९ कोटी रुपयांचे नुकसान झाले. मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज ही गुंतवणूकदारांचे सर्वाधिक नुकसान झालेली दुसरी कंपनी होती. रिलायन्सचे बाजार भांडवल ५०,६७० कोटी रुपयांनी घसरून १७.९६ लाख कोटी रुपयांवर आले.

टीसीएस आणि रिलायन्स व्यतिरिक्त, एचडीएफसी बँकेलाही मोठे नुकसान झाले. पाच दिवसांत त्याचे बाजार भांडवल २३,०९० कोटींनी घसरून १२.०८ लाख कोटींवर आले. याशिवाय, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, एलआयसी (LIC) चे बाजारमूल्य १९,६७० कोटींनी घसरून ५.१३ लाख कोटींवर आले.

शेअर बाजारातील घसरणीत सात कंपन्यांना तोटा झाला असताना, पहिल्या १० कंपन्यांपैकी तीन कंपन्या नफ्यात राहिल्या. यामध्ये, हिंदुस्तान युनिलिव्हरचे बाजारमूल्य २०,६५२ कोटींनी वाढून ५.४७ लाख कोटी झाले. एसबीआयचे बाजारमूल्य १९,५२२ कोटींनी वाढून १०.१६ लाख कोटी झाले. बजाज फायनान्सच्या गुंतवणूकदारांनीही पाच दिवसांत ८,२५३ कोटी कमावले, ज्यामुळे त्याचे बाजारमूल्य ५.७४ लाख कोटींवर पोहोचले.

Comments are closed.