आता, रोहित पवारांचं तोंड शिवलंय का? मारहाणीवरुन सदाभाऊंचा सवाल; आमदारांचेही जशात तसं उत्तर
सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांचा कार्यकर्ता असलेल्या शरनू हांडे प्रकरणावर बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट रोहित पवारांवर आरोप केले आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे सिनेस्टाईल अपहरण झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करुन हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र, या अपहरणची माहिती मिळताच सोलापूर (Solapur) पोलिसांचे 4 पथक तात्काळ शोधासाठी रवाना करण्यात आले होते. काल रात्री 10 च्या सुमारास अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यावरुन, आता राजकीय वातावरण तापलं असून आमदार सदाभाऊ खोत यांनीही रोहित पवारांचं तोंड आता शिवलंय का, असा सवाल केला. मात्र, रोहित पवारांनी (rohit pawar) पत्रकार परिषद घेत एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.
राष्ट्रवादीच्या रोहित पवारांच्या गुंडांनी गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांचं अपहरण केलं होतं. अपहरणकर्ते कर्नाटकमध्ये आढळून आले असून सोलापूरचे पोलीस अधीक्षक आणि संपूर्ण पोलीस दलाचे मी अभिनंदन करतो. गुंडागर्दी कुठे चालते, अपहरण,खून, भ्रष्टाचार कशा पद्धतीने होतात याचे विद्यापीठ आता रोहित पवार चालवत आहेत. आता रोहित पवारांच्या तोंडावरती बोट आहे का, आता, रोहित पवारांचं तोंड शिवलंय का, असा सवाल आमदार सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला. तसेच, गोपीचंद पडखळकरांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारा कार्यकर्ता कुणाचा. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरती हल्ला झाल्यानंतर त्याचा सत्कार रोहित पवार यांनी केला होता. त्यामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातली राष्ट्रवादी पुरस्कृत आणि रोहित पवार समर्थक जी गुंडागर्दी आहे, त्याला ठेचून काढावी, असेही खोत यांनी म्हटलं.
मी कोणाशीही व्हिडिओ कॉलवर बोलत नाही – पवार
दरम्यान, अपहरण व मारहाणीच्या घटनेवर रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कुठलाही व्यक्तींनी कायदा व सुव्यवस्था हातात घेतली असेल, जर तो व्यक्ती आमचा कार्यकर्ता असेल तर त्याचं समर्थन आम्ही करतं नाही. मी कोणाशी व्हिडिओ कॉल करत नाही, कोणाशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलत नाही, तुम्ही यावर एसआयटीमार्फत तपास करा, तुमच्याकडे सरकार आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले. मी सरकारच्या विरोधात बोलतो, मंत्र्यांचे कारनामे समोर आणतो. त्यामुळे माझा आवाज दाबण्याचा या माध्यमातून प्रयत्न आहे. पण, मी शांत बसणार नाही, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
मला अडकवण्याचा प्रयत्न – रोहित पवार
आमच्या कार्यकर्त्याला जेव्हा बेदम मारहाण झाली, त्याचा व्हिडीओ काढला होता, त्यावर केव्हा कारवाई होईल. गोपीचंद पडळकर यांच्या वाहनात रणनीती ठरली, या प्रकरणात रोहित पवार यांच्यावर आरोप करायची. त्यांनतर रुग्णालयात भाजप सेलचा एक कार्यकर्ता हांडेच्या कानात जाऊन काय सांगत होता, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच, त्या कार्यकर्त्याने लगेच माझं नाव घेतले. मी सरकार विरोधात बोलत असल्याने माझ्यावर आरोप केला जात आहे. पण, पोलिसांनी योग्य तपास करावा, याच्या मुळात जावं, वाटल्यास एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे. पडळकर यांना एकच विचारतो की, धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपच्या पैशात किती घोटाळा केला? फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय, खुश करायचं आणि पद घ्यायचं, असे म्हणत रोहित पवारांनी गोपीचंद पडखळकरांवरही हल्लाबोल केला.
दरम्यान, माझ्या अपहरणानंतर रोहित पवार हे व्हिडीओ कॉलवर आरोपींसोबत बोलत होते. तेव्हा मला सांगितलं अमित सुरवसेची माफी माग, मी नाही म्हणाल्यावर याला बघून घ्या असं रोहित पवार म्हणाले, असंं म्हणत शरणू हांडेंनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत.
हेही वाचा
राज्यात मराठा-ओबीसी दंगली घडल्यास देवेंद्र फडणवीसच जबाबदार; मनोज जरांगेंनी सांगितला मुंबईचा प्लॅन
आणखी वाचा
Comments are closed.