Sachin Tendulkar Birthday : सचिन तेंडुलकरचे ‘अटूट’ 10 रेकॉर्ड्स; कोणीही मोडणे अशक्यच

‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडूळकर आज आपला 53वा वाढदिवस साजरा करत आहेत. 24 एप्रिल हा दिवस जागतिक क्रिकेटसाठी एखाद्या सणासारखाच मानला जातो. 1989 मध्ये अवघ्या 16 व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध पदार्पण करताना कुणालाही कल्पना नव्हती की, हा कुरळ्या केसांचा मुलगा पुढे क्रिकेट इतिहासातील सुवर्णपान लिहिणार आहे. आज त्याच्या कारकिर्दीतील विक्रमांकडे पाहिल्यास ते अजूनही अभेद्य वाटतात.

सचिनच्या नावावर सर्वात मोठा विक्रम म्हणजे 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये मिळून ‘शतकांचे शतक’ पूर्ण करणारा तो एकमेव खेळाडू आहे. विराट कोहली सध्या 85 शतकांसह त्याच्या जवळ आहे, पण उर्वरित शतकांपर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण मानले जाते. याशिवाय सचिनने 664 सामन्यांत तब्बल 34,357 धावा केल्या आहेत. हा आकडा आजही इतर कुठल्याही फलंदाजासाठी दूरच आहे.

टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्येही सचिनची बादशाहत दिसून येते. टेस्टमध्ये त्याने 51 शतके झळकावली असून हा विक्रम अजूनही अबाधित आहे. जो रूट 41 शतकांसह जवळपास असला तरी सचिनच्या पातळीपर्यंत पोहोचणे मोठे आव्हान आहे. वनडेमध्ये सचिनने 18,426 धावा केल्या असून हा विक्रमही अजून अबाधित आहे.

सचिनचा क्रिकेटमधील प्रवासही तितकाच भव्य आहे. त्याने 24 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले, जे आजच्या युगात अत्यंत दुर्मिळ मानले जाते. तसेच 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. Mahela Jayawardene 652 सामन्यांसह जवळ पोहोचला, पण सचिनला मागे टाकू शकला नाही.

फक्त फलंदाजीच नाही, तर गोलंदाजीतही सचिनने कमाल केली. वनडेमध्ये 15,000 पेक्षा जास्त धावा आणि 150 हून अधिक बळी घेणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याची ‘गोल्डन आर्म’ अनेक वेळा भारतासाठी निर्णायक ठरली.

एकूणच, सचिन तेंडुलकरचे विक्रम केवळ आकडे नाहीत, तर ते क्रिकेटमधील एका युगाची ओळख आहेत. पुढील अनेक वर्षे हे विक्रम अबाधित राहतील, यात शंका नाही.

Comments are closed.