एकनाथ शिंदेंच्या कौतुक सोहळ्यानंतर संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल, थेटच म्हणाले…

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार देऊन त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर ठाकरे गट कमालीचा नाराज झाले आहे. एरवी शरद पवार यांच्याविषयी आदराने बोलणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरुन पवारांना प्रथमच खडे बोल सुनावले.  एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली. त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नव्हते पाहिजे. ही आमची भावना आहे. आम्ही महाराष्ट्रातील लोकांसमोर कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कोणी कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, आम्ही ज्यांना महाराष्ट्राचे शत्रू समजतो. त्यांच्यासोबत खुलेआम बसणे आणि त्यांना असे सन्मान आपल्या हातून देणं ही योग्य गोष्ट नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी संजय राऊत यांनी शरद पवार यांनी दिल्लीतील कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणे ही महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारी गोष्ट आहे. कदाचित पवारांची भावना वेगळी असेल, आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही आपला आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शाहांच्या सहकार्याने तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता. यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला वेदना झाल्या असतील. आम्हाला तुमचं दिल्लीतील राजकारण माहिती नाही. पण आम्हालाही राजकारण कळतं, माननीय पवार साहेब, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. राजकारणात काही गोष्टी टाळायला पाहिजेत. तुमचं आणि अजित पवार यांचं गुफ्तगू होत असेल, तो तुमचा कौटुंबिक प्रश्न आहे. अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला, कुटुंब फोडलं, याचं भान राखून आम्ही पावलं टाकतो, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

शरद पवार स्वागताध्यक्ष असलेल्या दिल्लातील मराठी साहित्य संमेलनावर राऊतांची टीका

दिल्लीतील साहित्य संमेलन म्हणजे दलाली सुरु आहे, ती राजकीय दलाली सुरु आहे. कोणालाही कसलेही पुरस्कार देत आहेत, कोणाचे कसेही सत्कार करत आहेत. यांचा साहित्याशी संबंध काय आहे? माझा आयोजकांना प्रश्न आहे, तुम्ही दिल्लीत दलाली करायला आला आहात का, काय साहित्याची सेवा करत आहात, कोण करतंय संमेलन आयोजित. हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपद्व्याप आहे. मराठीची काय सेवा करताय तुम्ही इकडे, महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणाऱ्यांचा तुम्ही सत्कार करताय. मी निमंत्रण असलं तरी या साहित्य संमेलनाला जाणार नाही. हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतील राजकीय दलाली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

ठाण्याचा विकास एकनाथ शिंदेंच्या काळात नव्हे तर सतीश प्रधानांच्या काळात: संजय राऊत

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला केवळ प्रगतीच्या पथावर नेण्याचे काम केले नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाला योग्य दिशा देण्याचे काम केले, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर संजय राऊत यांनी टीका केली. त्यांनी म्हटले की, ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला. शिवसेनेच्या 30 वर्षांच्या राजवटीत ठाण्याचा विकास झाला. ठाण्यातील गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव स्टेडिअम ही बाळासाहेब ठाकरेंची संकल्पना होती. सतीश प्रधान यांनी ती प्रत्यक्षात उतरवली. सतीश प्रधान यांच्याकडे विकासाची दृष्टी होती, त्यांनी टेंडरबाजी केली नाही. एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या राजकारणात खूप उशीरा आले. शरद पवारांना याबाबत माहिती नसेल, तर आम्ही ती पाठवून देऊ. एकनाथ शिंदे उशीरा आमदार झाले, ते ठाण्याचा राजकारणात आले आणि ठाण्याचा वाट लागायला सुरुवात झाली. ठाणे शहर बिल्डरांच्या घशात गेले, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

शरद पवारांनी स्टेट्समनशीप दाखवली, अमोल कोल्हेंचं राऊतांना प्रत्युत्तर

संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीकेचे आसूड ओढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. खासदार संजय राऊत यांची ही वैयक्तिक भूमिका नक्कीच असू शकते. परंतु दिल्लीत होऊ घातलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अंतर्गत हा कार्यक्रम होता. त्यामुळे मला असं वाटतं की शरद पवार यांनी एक चांगलं उदाहरण घालून दिलं आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण न आणता कुठेतरी त्यापलीकडेही बघितलं पाहिजे. किंबहुना  स्पेसमेंटशिपसाठी महाराष्ट्र ओळखला जातो. त्यामुळे संजय राऊत साहेबांचे हे वैयक्तिक मत असून त्यामागचं कारणही स्वाभाविक आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले.

शिंदे गटाची राऊतांवर टीका

शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हणाले की, संजय राऊत आता स्वतःला एवढे मोठे समजायला लागले आहेत की, ते आता शरद पवारांनी काय करावे आणि काय करू नये हे सुद्धा ते त्यांना सांगत आहेत. त्यामुळे यावर पवार साहेबांनी आपले मत व्यक्त करावे, असे मला वाटते. संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहे. ज्या आमदारांच्या मतावर निवडून आले आहेत, ज्यांनी त्यांना मतदान केले त्यांच्यावरच राऊत टीका करत आहेत. त्यांना एवढच वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.

https://www.youtube.com/watch?v=bv8ukowdt8m

आणखी वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.