चिन्नास्वामी स्टेडियमवर पुन्हा सुरक्षेचा भंग! आरसीबी विरुद्ध जीटी सामन्यादरम्यान सीसीटीव्ही कॅमेरांचे नुकसान, दोघांना अटक

आयपीएल २०२६ मध्ये २४ एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स सामना खेळला गेला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यावेळी अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर येत आहे. यामुळे लीगच्या सर्वात व्यस्त ठिकाणापैकी एक असलेल्या या स्टेडियमवरील सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्टेडियममधील तब्बल २४० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे निकामी झाले. यामागे दोन कर्मचारी असल्याचे समोर येत आहे. ते दोघे सामन्याच्या वेळेत वैध पासशिवाय नियंत्रण कक्षात घुसले आणि त्यांनी ती यंत्रणा नष्ट केली, ज्यामुळे पोलिसांना अनेक भागांमध्ये प्रवेश करणे अशक्य झाले. डेक्कन हेराल्डच्या वृत्तानुसार, क्युबन पार्क पोलिसांनी या घटनेशी संबंधित चित्रदुर्गातील हिरियूरच्या मंजुनाथ (३७) आणि उत्तर प्रदेशच्या अब्दुल कलाम (१९) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

‘ही घटना २४ एप्रिलला सामन्यादरम्यान घडली. दोन्ही आरोपी आयव्हीएस डिजिटल सोल्युशन्स या एजन्सीच्या एका उपविक्रेत्याकडे सामन्याच्या दिवशी डिजिटल सेवा पुरवण्याचे काम करत होते,’ अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पोलिसांना आरोपींनी सांगितले की त्यांना थकबाकी न मिळाल्याने त्यांनी हे कृत्य केले होते. १० लाख रुपयांची रक्कम न भरल्यामुळे हे कृत्या केल्याचे समोर येत आहे.

चिन्नास्वामीमध्ये नुकतेच ही घटना घडल्याने पुन्हा एकदा स्टेडियमच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील हंगामातही झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ११ लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. त्यानंतर तेथे कोणत्याही प्रकारचे स्पर्धात्मक क्रिकेट सामने खेळले गेले नाही. केवळ २०२६ च्या आयपीएल हंगामात तेथे पुन्हा क्रिकेट परतले. स्पर्धेदरम्यान, कॅन्टीनमधील एक कर्मचारी सामन्यांच्या तिकिटांचा काळाबाजार करताना पकडला गेला होता. आता सीसीटीव्ही फीड कापल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

Comments are closed.