राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, विशेष अधिवेशन बोलवा; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
सातारा : राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून मुंबईसह (mumbai) विविध जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबईतील रस्त्यांना वाहत्या नद्यांचे रुप आल्याचं दिसून येत आहे. मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसामुळे (Rain) शेती पिकांचे आणि बळीराजाचे मोठं नुकसान झालं आहे. नदीच्या प्रवाहात जनावरे वाहून गेली असून शेतातही पाणीच पाणी झाल्याने बळीराजाला अतिवृष्टीचा फटका बसल्याचं चित्र दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant shinde) यांनी केली आहे. तसेच, सरकारने विशेष अधिवेशन बोलवून शेतकऱ्यांना मदत द्यावी, असेही त्यांनी म्हटलं आहे.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी तात्काळ विशेष अधिवेशन घेण्याची मागणी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. मात्र, अद्याप पंचनामे देखील झालेले नाहीत. ज्या ठिकाणचे पंचनामे झाले आहेत त्यांना अद्याप मदत झालेली नाही. त्यामुळे, राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करुन एकरी 50 हजारांची मदत करावी, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन उभारू
महायुती सरकारची घोषणाच कर्जमाफीची होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत वेळ आली तर कर्जमाफी करू, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरसकट कर्जमाफी करता येत नाही, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे, जर सरकारने लवकरच सरसकट कर्जमाफीची घोषणा केली नाही तर आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठं आंदोलन उभारू, असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागात मुख्यमंत्री
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पावसाचा आढावा घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागात येऊन पाहणी केली. राज्यातील विविध भागात जी अतिवृष्टी होत आहे त्यात कंट्रोल रुममधून संवाद साधला. यावेळी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी उपलब्ध होते. राज्यात दोन दिवसांपासून अतिवृष्टी होते आहे, 18 ते 21 ऑगस्टमध्ये पाऊस अधिक असणार आहे. त्यामुळे, काही जिल्ह्यात रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट आहे. अंबा जगबुडी नदी इशारा पातळीपर्यंत पोहचली आहे, वशिष्टी नदीवर देखील लक्ष ठेऊन आहे. तापी आणि हतनूरला अधिक पाणी आल्याने रावेरमध्ये पाणी शिरलंय. तसेच, जळगाव सर्वाधिक अफेक्टेड आहे, पुणे जिल्ह्यात सर्वच धरणात चांगले पाणी आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
आदिती तटकरेंचंही आवाहन
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार मुंबई महानगर व परिसरात पुढील 3-4 तास अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व मुंबईकरांना कळकळीची विनंती, आपण सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षातील 1916 या मदत सेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.